अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत इतरांचा हिशोब चुकता करणार - आ. लहामटे

अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत इतरांचा हिशोब चुकता करणार - आ. लहामटे

कोतूळ |वार्ताहर| Kotul

शरद पवार आणि अजित दादा पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यामुळे अकोले तालुक्यात गावागावांत रस्त्याच्या विकासाची कामं सुरू आहेत. सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी अकोले तालुक्याला आणला या नेतृत्वामुळेच तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली. गेली दोन अडीच वर्षे अकोले तालुक्यात अतिशय भरीव काम करता आले. अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री पिचड यांचा हिशोब चुकता करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक शेतकरी समृद्धी विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ अकोले येथे अगस्ति आश्रम, इंदोरी येथील विठ्ठल मंदिर व म्हाळादेवी येथील खंडेश्वर मंदिर येथे करण्यात आला. त्यानंतर अकोले तालुक्यातील इंदोरी येथील साई लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात आ. डॉ. लहामटे बोलत होते.

याप्रसंगी कैलासराव वाकचौरे, मधुकराव नवले, अमित भांगरे, अ‍ॅड. वसंतराव मनकर, विजयराव वाकचौरे, विठ्ठलराव चासकर, प्रकाश मालुंजकर, सोन्याबापू वाकचौरे, मंदाताई नवले आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

पिचड यांनी नेहमी सुडाचे राजकारण केले. विकासाचे आणि पाण्याचे नियोजन करता आले नाही. अकोले- सिन्नर रस्ता दोन पदरी करता आला नाही, अगस्ती कारखाना चालवण्याची क्षमता फक्त गायकर यांच्यामध्येच आहे. ज्या सहकार्‍याने तुम्हाला सांभाळले, त्या नेत्याचे धोतर तुम्ही वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला, त्याचा हिशोब या निवडणुकीत चुकता होणार आहे. आपल्या सहकार्‍याची इतकी विटंबना करण्यात येत असेल तर सामान्य जनतेच्या बाबतीत आपले काय प्रेम आहे हे जनतेला समजते.

उत्पादक सभासदांना ज्याप्रमाणे दीपावलीला साखर देतात त्याप्रमाणे आदिवासी सभासदांना का दिली नाही. ज्या आदिवासींच्या शेअर्सवर कारखाना उभा राहिला त्यांना न्याय देता आला नाही, याचा कधी विचार केला नाही. 28 वर्षांत आदिवासी लोकांना भावनिकदृष्ट्या वापर केला. एवढ्या वर्षात अगस्ती सहकारी कारखाना पिचड यांनी सुस्थितीत आणायला पाहिजे होता. ती त्यांची जबाबदारी होती. त्यांनी व्यवस्थित चालवला नाही आणि आता ते कारखान्यासाठी आपली गरज असल्याचे सांगत आहेत, अशी टीका आ. डॉ. लहामटे यांनी केली.

सिताराम पाटील गायकर म्हणाले, अगस्ती कारखाना ही शेतकर्‍यांची भाग्यलक्ष्मी आहे. ती वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ, अगस्ती वाचविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावू पण कारखाना बंद होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.

गेल्या पाच वर्षांपासून कारखाना सिताराम गायकर सक्षमपणे चालवत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कारखाना चालवला. यापुढील काळात देखील त्यांचे नेतृत्व या कारखान्याला आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अजित नवले यांचेही भाषण झाले. अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी, सभासद याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com