रोगराई पसरु नये यासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे - आ. थोरात

रोगराई पसरु नये यासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे - आ. थोरात

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यातून रोगराई वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे साथीचे रोग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वांवर कोणीतरी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. याविषयी शिर्डीच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे मला बघावयास मिळाले, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत केले.

आ. थोरात हे काल शिर्डीत आले असता त्यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. पंकज लोंढे, लताताई डांगे, शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले, अशोक कोते, शितलताई लोहारे, सुरेश आरणे, उमेश शेजवळ, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, शिर्डी परिसरात 31 ऑगस्ट रोजी पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण शिर्डीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासन म्हणून जी जबाबदारी आहे, ती पार पाडली जातेय का? साईमंदिरात हार-फुले नेण्यासंदर्भात ते म्हणाले, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून या ठिकाणी देशविदेशातून अनेक भाविक श्रद्धेने येतात. त्यांना येथे चांगल्या पद्धतीने पूजा करता येणं हे आवश्यक आहे. त्याबरोबरच शिर्डीमध्ये मोठा रोजगार या देवस्थानामुळे निर्माण झाला आहे. शिर्डी परिसरातील शेतकर्‍यांचा फुलशेतीमध्ये फायदा आहे. तसा फूल विक्रेत्यांसाठी देखील रोजगार आहे. साई मंदिरात फूल-हाराला बंदी का घातली? या गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत. फुलं हारांबाबत प्रशासनाची भूमिका काय? यासंदर्भात आणखी काही लोकांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींची बैठक 19 सप्टेंबर रोजी होत असून ही प्राथमिक बैठक आहे. पुढची निवड करण्यासंदर्भातील काही चर्चा प्रमुख नेत्यांमध्ये होणार आहे. त्या संपूर्ण प्रतिनिधींमध्ये त्याबाबतीत निर्णय होतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com