संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
निवडणूक आयोगाने जरी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्यात आलेला निर्णय घेतला असला तरी जनता जो निर्णय देईल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच राहील. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय लोकशाहीला घातक असल्याचे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे. त्यामुळे शिवसेना ही ठाकरेंपासून कोणीच वेगळी करू शकत नाही. हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला असला तरी जनता जो निर्णय देईल तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच राहील. हे आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.
निरपेक्ष भावनेने स्वायत्त संस्थांनी निर्णय देणे अपेक्षित आहे. कुठल्या एखाद्या गटाच्या बाजूने निर्णय देणे योग्य नाही तर दोन्ही बाजूने निर्णय देणे अपेक्षित आहे. परंतु या स्वायत्त संस्थेत किती राजकारण झाले आहे हे आजच्या निकालावर स्पष्ट झाले आहे. सध्या देशात जे राजकारण चालू आहे ते राजकारण जनता खपवून घेणार नाही आणि त्यांना चौकसपणे उत्तरही देईल. असे मत आमदार थोरात यांनी व्यक्त केले.
सत्तांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी गरजेची - आ. थोरात
पैशाच्या जोरावर सत्तांतर होऊ नये म्हणून संसदेने पक्षांतर बंदी कायदा करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. संसदेने पक्षांतर बंदीचा जो कायदा केला आहे त्या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे जसे महाराष्ट्रात सत्तांतर झाले तसे इतर राज्यातही पक्ष सोडून सत्तांतर होण्याचे प्रमाण वाढेल या कायद्यामुळे भविष्यात राजकारणातील अनेक मोठ्या गोष्टी घडते.