आ. थोरातांच्या रेट्यामुळेच डाव्या कालव्यातून पाणी सुटले

थोरात गटाचा दावा || कृती समितीचाही केला उल्लेख
आ. थोरातांच्या रेट्यामुळेच डाव्या कालव्यातून पाणी सुटले

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून या भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे व उजव्या कालव्याची कामे ही त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारकडे केली. आ. थोरात यांच्या मागणीला यश आले असून त्यामुळेच शनिवारी डाव्या कालव्यातून पाणी सुटले, असा दावा थोरात समर्थकांनी केला आहे.

थोरात गटाच्या पत्रकानुसार, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे उजव्या कालव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आमदार थोरात यांनी सातत्याने आग्रही मागणी केली होती. याचबरोबर निळवंडे कृती समितीनेही 13 सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले होते. यावर प्रशासनाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचे आश्वासित केले गेले. पुन्हा 10 ऑक्टोबर अशा तारखा दिल्या. आ.थोरात व जनतेच्या रेटा यापुढे सरकार झुकले असून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावात करिता आ.थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे अगदी करोनाच्या संकटातही रात्रंदिवस काम करून पूर्ण केली आहेत. मे महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे दहा टीएमसी पाणी असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी आ.थोरात यांनी केली होती. यानंतर डाव्या कालव्याला पाणी सोडले होते.

यावर्षी या उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळाची छाया, जनावरांचा चार्‍याचा प्रश्न, रोजगार हमीच्या कामांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. मात्र या सर्व प्रश्नांबाबत सरकार उदासीन असून या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारकडे केली आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

उजवा कालवाही त्वरीत पूर्ण करा : थोरात

उत्तर अहमदनगर जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे ही आपली सातत्याने मागणी ही तातडीने पूर्ण झाला पाहिजे. अकोले तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांनी कालव्यांच्या कामासाठी कायम मोठे सहकार्य केले आहे. त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. उजव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून टेस्टिंग करून सर्व गावांनाही त्वरीत पाणी द्यावे, अशी मागणी ही आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com