इकडे दहशत चालणार नाही, अन तिकडचीही कमी करु - आ. थोरात

आ. बाळासाहेब थोरात
आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

विकास कामे आम्ही करायची, श्रेय यांनी घ्यायचे, निधी आम्ही आणायचा, उद्घाटने यांनी करायची, निळवंडे कालव्यांसाठी मोठा निधी मिळवून रांत्रदिवस काम सुरु ठेवले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात 782 कोटी रुपयांचा निधी मिळवला. यांचे सरकार आले, सर्व कामे ठप्प झाले. आणि आता यांचा पाहुणा येणार, कोण पाहुणा येतो ते पाहु, यापुढे दहशतीचे राजकारण चालणार नाही, इकडे तर चालणारच नाही मात्र तिकडचीही दहशत कमी करु, असा इशारा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता दिला आहे.

तालुक्यातील झोळे येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. आ. थोरात पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधून सातत्याने निधी मिळवला. विकास कामे केली. हा निधी मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याचे पालकमंत्री मात्र मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते हे सर्व जनतेला माहिती आहे.

तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत मात्र या चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी काही लोक उपद्रव निर्माण करत आहेत. जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू असे सांगताना देश व राज्यपातळीवर राजकारणाची अवस्था वाईट झाली असून खा. राहुल गांधी यांनी 20 हजार कोटींच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला अद्याप पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. उलट तातडीने खासदारकी रद्द केली आहे.

राज्यातील सरकार कोर्टाच्या निर्णयानंतर एका मिनिटात पायउतार होईल. धार्मिक तेढ निर्माण करून केले जाणारे राजकारण हे पुरोगामी व मानवतेचा विचार असलेल्या महाराष्ट्राला मान्य नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

मिलिंद कानवडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून पाणीपुरवठा योजनांसाठीच्या सर्व मंजूरी या 11 मे 2022 रोजी मिळाली आहे. आणि सध्याचे सरकार ही 30 जून 2022 रोजी सत्तेवर आले आहे. या निधी मंजुरी मध्ये खोके सरकारचा काहीही संबंध नाही. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करत फिरत आहे. खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. संगमनेर तालुक्याला संस्कृत राजकारणाची परंपरा आहे, येथील विकास कामात अडथळे आणणार्‍यांचा बंदोबस्त करू, असेही ते म्हणाले.

खबर्‍यांचा बंदोबस्त जनता करेल

संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोट्या-नाट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणार्‍या या खबर्‍यांचा बंदोबस्त जनताच करेल, असेही आमदार थोरात यावेळी म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com