राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची आ. थोरातांकडून पाहणी

केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगावमध्ये पाहणी
राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची आ. थोरातांकडून पाहणी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी व गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी केली असून या अवकाळी पावसाने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत द्या, अशी आग्रही मागणी आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तालुक्यातील गोगलगाव, पिंपळस, दहेगाव, केलवड, निर्मळ पिंपरी या गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी समवेत शिर्डी विधानसभा काँग्रेस नेते सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदीप कोकाटे, बबन नळे, उत्तमराव मते, गणेश चोळके, जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, अण्णासाहेब निरगुडे, विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे, विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, अण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतीश डांगे, सुभाष निर्मळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन फळबागा व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. याप्रसंगी आ. थोरात म्हणाले, राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे . फळबागा, भाजीपालासह सर्व पिकांसाठी खते, बी बियाणे यासाठी शेतकर्‍याला मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. लहान मुलांसारखी पिकांची जोपासना करावी लागते. त्यातच अशा अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले जाते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी शेतकर्‍यांना वेळेवर मोठी मदत झाली असून सहजतेने मदत उपलब्ध झालेली आहे. या सरकारनेही घोषणा न करता शेतकर्‍यांना जे नुकसान झाले आहे. त्याकरिता भरीव मदत केली पाहिजे. झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे जे कर्ज आहे ते भरता येईल एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. जेणेकरून नुकसानग्रस्त पीक काढून नवीन पीक उभे करता येईल. अशी भरीव मदत करावी, अशी मागणीही आ. थोरात यांनी केली. यावेळी राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांनी त्यांच्या फळबागा व झालेल्या नुकसानीबाबत आ. थोरात यांच्यापुढे समस्या मांडल्या. या सर्व शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत शासनदरबारी पाठपुरावा करू, असेही आमदार थोरात यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com