महसूलचे आदेश विकासातील खोडा

माजी मंत्री थोरात || बेकायदेशिर पद्धतीने कामकाज
महसूलचे आदेश विकासातील खोडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रत्येकाची कामकाज करण्याची एक पद्धत असते. सध्या राज्याला नवे महसूल मंत्री मिळाले आहेत. मात्र या विभागातर्फे निघणारे अनेक आदेश बेकायदेशीर आणि विकासाला खोळंबा घालणारे आहेत. विशेषत: गौणखनिज प्रकरणात ते ठळकपणे दिसून आले, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नगर दौर्‍यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामकाजावर अप्रत्यक्ष टीका केली. गौणखनिज प्रकरणात भाजपचे आमदार नसलेल्या ठिकाणी कारवाई होत असल्याच्या प्रश्नावर आ.थोरात म्हणाले, नव्या महसूल मंत्र्यांनी ज्या पद्धतीचे काम सुरू केले, ते सर्वजण पाहत आहोत.

सध्या विकासकामे तर बंद झालीच आहेत. पण महसूल विभागातून सुटलेले अनेक आदेशही बेकायदेशिर, अन्यायकारक आहेत. निळवंडे धरणाचे कामे गेल्या अडीच वर्षात खूप पुढे घेवून गेलो. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मोठा निधी दिला. त्यामुळे कामाला वेग आला. आगामी जानेवारीत पाटातून पाणी सोडवे, असा आमचा प्रयत्न होता. मात्र जिरायत भागाला नवसंजीवनी देणारे हे कामही खाणी बंद पाडल्यामुळे खोळंबले आहे.

सीमावाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक उकरून काढला. त्यांची एकूण भाषा महाराष्ट्राचा अवमान करणारी आहे. आपण राज्य म्हणून या मुद्यावर लढा देणार आहोत. मात्र आधी सरकारने स्पष्ट भुमिका घ्यावी, असे ते म्हणाले. राज्यात महापुरूषांचा अवमान, सीमावादात सरकारची बोटचेपी भुमिका याविरोधात विरोधी पक्षांच्या महामोर्चाला परवानगी न देणे हा सरकारकडून लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी सांगीतले.

विरोधकांकडून चर्चेची तयारी

नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक म्हणून आमची राज्यासमोरील प्रश्नांवर चर्चा करण्याची भुमिका आहे. राज्यातून गुजरात पळविण्यात आलेले उद्योग, राज्यातील बेरोजगारी, महापुरूषांचा अवमान, सीमावाद यावर विरोधक म्हणून सरकारला जाब विचारणार आहोत. सोबतच राज्यातील समस्यांवर साधक-बाधक चर्चा व्हावी, अशीही आमची भुमिका आहे. सरकार कसा प्रतिसाद देणार, यावर आमची नजर असेल, असेही आ.थोरात एका प्रश्नावर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com