
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
देश हिताचा व लोकशाही वाचवण्यासाठीचा काँग्रेसचा विचार असून तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘हातसे हात जोडो’ अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. तर व्यासपीठावर श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष किरण काळे, डॉ. जयश्रीताई थोरात, उत्कर्षाताई रुपवते, हेमंत ओगले, बाबा ओहोळ, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, सचिन गुंजाळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, संगमनेरचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्यासाठी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक ठरली आहे. महाराष्ट्राच्या समन्वयाची जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्रात या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. संत व समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र असल्याने पुरोगामी विचार येथे रुजला आहे. महाराष्ट्रातील यात्रेचे व शेगाव सभेच्या नियोजनाचे देशपातळीवर कौतुक झाले.
देशात सध्या महागाई व बेरोजगारी ही अत्यंत मूलभूत प्रश्न असून या मूळ प्रश्नांवरून लक्ष हाटवण्यासाठी इतर प्रश्न निर्माण करून विविध चैनल वर दाखवले जात आहेत. सध्या देशात जाती-धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून हे अत्यंत घातक आहे. जनतेच्या हिताच्या कोणताही निर्णय होत नाही. प्रेमाचा एकतेचा व लोकशाहीचा संदेश देण्यासाठी ‘हातसे हात जोडो’ हे अभियान असून गावोगाव हे अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवा. आगामी काळ हा महाविकास आघाडीचाच असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेना तोडणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला सहन होणारे नाही. याचबरोबर काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून हाच आपला विचार आहे. ‘हात से हात जोडो’ या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार लहू कानडे म्हणाले, काँग्रेसला मोठी ऐतिहासिक परंपरा असून काँग्रेसने देशाला गुलामगिरीतून बाहेर काढले आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळून दिले. स्वातंत्र्याने संविधान दिले आणि संविधानाने बंधुता व समता दिली. मात्र काही लोक धार्मिक तेढ निर्माण करून विषमता पेरण्याचे काम करत आहे. केंद्र व राज्य सरकार स्वायत्त संस्था हाताशी धरून कार्यकर्त्यांना भीती दाखवून त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी ‘डरोमत’ हा संदेश दिला आहे. विविधतेतील एकता हे देशाचे वैशिष्ट्य असून सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात ‘हातसे हात जोडो’ हे अभियान यशस्वीपणे राबवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, सचिन गुजर, करण ससाणे, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुंजाळ, उत्कर्षाताई रूपवते, मिलिंद कानवडे आदींची भाषणे झाली.
यावेळी जिल्ह्यातील सोन्याबापूि वाकचौरे, सुरेश झावरे, उबेद शेख, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, अर्चनाताई बालोडे, शंकरराव खेमनर, प्रताप शेळके, अविनाश दंडवते, विक्रम नवले, आप्पा काकडे, प्रमिलाताई अभंग, अशोक हजारे, राहुरीचे बाळासाहेब आढाव, मनोज गुंदेचा, अजय फटांगरे, सचिन चौगुले, अरुण नाईक, अमृतराव धुमाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे व सचिन गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी केले तर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले.
‘हात से हात जोडो’ अभियान
भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हातसे हात जोडो’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाशी संपर्क करण्यात येणार असून काँग्रेसचा विचार पोहोचवला जाणार आहे. याचबरोबर विविध बैठका, पदयात्रा, पत्रक वाटप, कॉर्नर बैठक, एलईडी व्हॅन मधून माहितीपट, गनवाईज बैठका, तालुका मेळावा, जिल्हा मेळावा यांसह मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया ऍक्टिव्ह करून भारत जोडो अभियान सह काँग्रेसचे उपक्रम अधिकाधिक तरुण व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे.
आ. थोरात यांचे भारत जोडोसाठी अहोरात्र परिश्रम
महाराष्ट्रातून 381 किलोमीटरची पदयात्रा झाली असून या यात्रेचे अत्यंत सुंदर नियोजन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. या 381 किलोमीटरच्या मार्गावरून आमदार थोरात यांनी या यात्रेपूर्वी सात वेळा प्रवास करून अत्यंत चांगले नियोजन केले. या परफेक्ट मॅनेजमेंटचे देशपातळीवर कौतुक झाले असून रात्रंदिवस परिश्रम करणारे आमदार थोरात यांच्या कार्यपद्धतीमुळेच ही यात्रा यशस्वी झाली असल्याचे उत्कर्षा रुपवते यावेळी म्हणाल्या.