5 नंबर साठवण तलावाला छुपा विरोध होवूनही दिलेला शब्द पाळला

5 नंबर साठवण तलावाला छुपा विरोध होवूनही दिलेला शब्द पाळला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

5 नं. साठवण तलाव झाल्यास आपले पाण्यावर चालणारे राजकारण बंद होईल, अशी भीती असणार्‍यांनी 5 नं. साठवण तलावाला छुपा विरोध केला. दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून न्यायालयात देखील गेले. मात्र कोपरगावकरांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी होता. त्यामुळे छुपा विरोध होवूनही शरद पवार यांच्या सहकार्याने व कोपरगावकरांच्या आशीर्वादाने पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द पाळला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 131.24 कोटी रुपये निधीतून करण्यात येणार्‍या साठवण तलाव क्र. 5 च्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे नुकताच आ. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजनाने येसगाव येथे पार पडला. आ. आशुतोष काळे यांचे औक्षण करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी ते बोलत होते.

आ. काळे म्हणाले, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील 12 वर्षापूर्वी त्यांच्या कार्यकाळात चार नं. साठवण तलावाची क्षमता वाढविण्यासाठी 2 कोटीचा निधी आणला होता. परंतु त्यावेळी दुर्दैवाने ते काम होवू शकले नाही. ते काम पूर्ण झाले असते तर 2021 पर्यंत पाणी टंचाई जाणवली नसती. नागरिकांच्या दारासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहून मनाला वेदना होत होत्या. त्यावेळी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असा निश्चय केला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, शहराला आवश्यक असणारा पाणी साठा आरक्षित आहे.

मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर साठवण क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यामुळे सत्ता नसतांना देखील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी 5 नं. साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी आग्रह धरला, संघर्ष केला, आंदोलन, उपोषण केले. मात्र सत्ता नसल्यामुळे हात बांधलेले होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुक प्रचारात पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द दोनच महिन्यात 5 नं. साठवण तलावाचे काम सुरु करून आश्वासक सुरुवात केली.

समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीकडून मोफत खोदकाम करून घेवून कोपरगावच्या जनतेचे जवळपास पाच ते सहा कोटी रुपये वाचविले. मात्र काम सुरू असताना चांगल्या कामात अडचणी आणणार्‍या काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी अनेक अडचणी आणण्याचं काम करून दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोर्टामध्ये केस दाखल केली. शासनाला अनेक प्रकारचे निवेदन दिले. काम बंद पाडण्यासाठी काही लोकांना आंदोलन करायला लावले. मात्र आपले आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे या अडचणींवर मात करून कोपरगावच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला याचे मोठे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सागितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसेच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून तसेच विविध संघटनांकडून आ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, अजित लोहाडे, सुधीर डागा, राजेंद्र झावरे, राजेश ठोळे, सुधाताई ठोळे, तुलसिदास खुबानी, विजय बंब, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राजेंद्र सनेर, महेश पटेल, अरविंद भन्साळी, संजय भन्साळी, मनीष फुलपगर, सुरेंद्र ठोळे, कांतीलाल पटेल, आशुतोष पटवर्धन, उत्तमभाई शहा, डॉ. विलास आचारी, डॉ. अजय गर्जे, राजेंद्र बंब, दीपक विसपुते, सतीश कृष्णाणी, मंदार आढाव, सलीम पठाण, संदीप रोहमारे, सुनील फंड, धरमचंद बागरेचा, संदीप वर्पे, दिलीपराव बोरनारे, माधवराव खिलारी, सुनील गंगूले, भरत मोरे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, वर्षा गंगुले, अजीज शेख, तसेच पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक संदीप वर्पे यांनी केले तर आभार सुनील गंगुले यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर चैतालीताई काळे यांनी व्यासपीठावर न जाता सरळ महिलांमध्ये जावून बसल्या. एक महिला म्हणून त्यांच्या देखील चेहर्‍यावर पाणी प्रश्न सुटणार असल्याचा आनंद दिसून येत होता. यावेळी त्यांनी दाखविलेला साधेपणा हा तर चर्चेचा विषय झालाच परंतु 5 नंबर साठवण तलावाच्या बाबतीत 5 नं. साठवण तलावाचे काम बंद पडले. साठवण तलाव होणार नाही अशा अफवा पसरविणार्‍यांचा देखील त्यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. ज्या साठवण तलावाच्या तुम्ही अफवा पसरवितात. त्याच तलावातून तुमच्या शेतात पाईपलाईन जातात हे विसरु नका, असा रोखठोक इशारा चैतालीताई काळे यांनी दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com