साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या - आ. आशुतोष काळे

साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या - आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेती सिंचनासाठी एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तनाचा लाभ गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच शेतकर्‍यांना मिळालेला आहे. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी चालू सिंचन वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी गुरुवारी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावांत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असणार्‍या अनेक गावच्या स्थानिक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन मिळावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची व कोपरगाव शहरात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाणी टंचाईची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी निर्माण झालेली पाणी टंचाई पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊन गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश देऊन गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

त्या मागणीनुसार गुरुवार पासून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार डाव्या-उजव्या कालव्यांना नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून चालू सिंचन वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उजव्या कालव्यास तात्पुरत्या स्वरूपात 300 क्युसेस व डाव्या कालव्यास 200 क्युसेसने पाणी सोडण्यात येणार असून नंतर पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. सर्व पाणीपुरवठा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने काळजीने भरून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

पिण्याच्या पाण्याचे आवर्तन साधारण 10 ते 12 दिवसांत पूर्ण होईल. धरण लाभक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असताना दरम्यानच्या काळात कोपरगाव तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यास शेतीसाठी आवर्तनाची गरज भासल्यास ओव्हरफ्लो मधून शेतीसाठी आवर्तनाची मागणी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे करणार आहे.

- आ. आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com