दु:ख विसरा आणि लढायला शिका, भाऊ म्हणून मी पाठीशी- आमदार काळे

दु:ख विसरा आणि लढायला शिका, भाऊ म्हणून मी पाठीशी- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पतीचे निधन होते त्यावेळी होणारे दु:ख काय असते हे त्या माऊलीलाच माहित असते. समाज फक्त सांत्वन करतो. मात्र अशा संकटसमयी या माऊलींना या धक्क्यातून सावरण्यासाठी आधार अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या करोनाने ज्या महिलांचे कुंकू हिरावून घेतले त्या महिलांना माझे तीन महिन्यांचे वेतन देण्याचे रक्षाबंधनाच्यावेळी जाहीर केले होते. त्याप्रमाणे सर्व महिलांना माझ्याकडून ही माझी कर्तव्य भेट आहे. तुमच्यावर अनपेक्षितपणे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र तुम्हाला आता तुमच्या कुटुंबासाठी हे दु:ख विसरावे लागणार आहे. त्यामुळे आता दु:ख विसरा आणि लढायला शिका, भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी करोनाने पती गमाविलेल्या महिलांना दिली.

महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे करोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्या महिलांना आ. आशुतोष काळे यांनी आपल्या तीन महिन्यांचे वेतन देण्याचे जाहीर करून राज्यापुढे आपला वेगळा आदर्श ठेवला आहे. मतदार संघातील करोनाने पती गमावलेल्या सर्व माता-भगिनींची माहिती संकलित करून एकूण 350 महिलांना कर्तव्य निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य अनिल कदम, मधुकर टेके, रोहिदास होन, धरमचंद बागरेचा, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, उमा वहाडणे, सुहासिनी कोयटे, संगिता मालकर, सुधा ठोळे, स्वप्नजा वाबळे, वैशाली आभाळे, डॉ. वैशाली आव्हाड, मिना गुरले, रुपाली गुजराथी, गायत्रीताई हलवाई उपस्थित होते.

आ. काळे म्हणाले, मागील वर्षापासून आलेल्या करोना विषाणूने मतदार संघातील अनेक कुटुंबावर मोठे आघात केले. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले असून जिवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली आहेत. ते दु:ख मी देखील सोसले आहे. मात्र कोविडमुळे ज्या महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले व त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती करोनाने हिरावून घेतला त्या महिलांचे दु:ख नक्कीच मोठे आहे. एकीकडे पती गमावल्याचे दु:ख तर दुसरीकडे पतीच्या रूपाने घरातील कमावती व्यक्तीच्या निधनामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होणार असे प्रश्न या महिलांपुढे आहेत. त्यामुळे त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या उद्देशातून छोटीशी कर्तव्यभेट म्हणून मी माझे तीन महिन्यांचे वेतन दिले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून देखील एकल महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळवून देण्यास प्राधान्य देईल. यापुढे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तरी तुमचा भाऊ समजून माझ्याशी संपर्क करा तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com