साखरेचा दर लक्षात घेऊन बँकांनी साखर तारण मर्यादा वाढवावी

कर्मवीर काळे कारखान्याचा गाळप हंगाम सुरू
साखरेचा दर लक्षात घेऊन बँकांनी साखर तारण मर्यादा वाढवावी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असून ऊस मिळविण्याची स्पर्धा साखर कारखान्यांना करावी लागणार असून पहिला हप्ता चांगला द्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक बाजारपेठेतील साखरेचा दर विचारात घेऊन जिल्हा बँकांकडून अपेक्षित उचल मिळणे आवश्यक आहे. तरच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पहिली उचल कारखाने चांगल्या पद्धतीने देऊ शकणार आहे. त्यासाठी जिल्हा बँकांनी साखर तारण मर्यादा वाढवावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या पत्नी चंद्रकला यांच्या हस्ते विधिवत पूजन करून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार 14.07 लाख हेक्टर क्षेत्र ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून त्यातून 88.58 लाख साखर उत्पादन होईल, असा अंदाज असून या व्यतिरिक्त 15 लाख मे. टन साखरेचा इथेनॉल निर्मितीकरिता वापर होणार आहे. मागील हंगामात राज्यामध्ये 105 लाख मे.टन साखर उत्पादन झाले होते. त्यापूर्वी 2021-22 मध्ये 137 लाख मे.टन साखर उत्पादन महाराष्ट्रात झालेले असून मागील वर्षाच्या तुलनेत 15 ते 17 लाख मे.टन व 2021-22 च्या तुलनेमध्ये जवळपास 45 ते 50 लाख मे.टन साखर उत्पादन कमी होणार आहे. चालू वर्षाचा गाळप हंगाम हा कमी दिवसांचा अडचणींचा आहे. एकूण 6 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले असल्याचे सांगितले.कारखाना विस्तारीकरण व आधुनिकीकरणाचे दुसर्‍या टप्प्यातील सर्व कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन 1 नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने सहा हजार मे.टन क्षमतेने चालणार आहे. त्यामुळे कारखान्यासाठी जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होऊन इतर कारखान्यांच्या तुलनेत आपला कारखाना जास्त दिवस सुरू राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे, सर्व संचालक मंडळ, कारभारी आगवण, बाळासाहेब कदम, एम.टी. रोहमारे, नारायणराव मांजरे, काकासाहेब जावळे, ज्ञानदेव मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी, बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, संभाजीराव काळे, सुधाकरराव दंडवते, देवेंद्र रोहमारे, दौलतराव मोरे, सुभाष गवळी, राजेंद्र जाधव, माधवराव खिलारी, सुनील गंगुले, चारुदत्त सिनगर, सुनील कोल्हे, ज्ञानेश्वर आभाळे, निवृत्ती गांगुर्डे, कैलास कापसे, आदींसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी मानले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com