सरकार बदलले तरी विकासाचे थर रचणारच - ना. काळे

सरकार बदलले तरी विकासाचे थर रचणारच - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गत अडीच वर्षात मतदार संघात 1100 कोटीच्या विकासाची हंडी रचली. सरकार जरी बदलले तरी विकासाचे आणखी थर रचणारच, असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.दहीहंडी उत्सव सिने अभिनेत्री माधुरी पवार यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवास प्रारंभ करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ना. काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्युत रोषणाईने सजविलेल्या दहीहंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. उपस्थित जनसमुदायाने गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक या परिसरात नागरिकांनी जागा मिळेल त्या ठिकाणी इमारतीच्या बाल्कनीत उभे राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला. गोविंदा पथकातील गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती.

ना. काळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून केलेला विकास जनतेने पाहिला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय बदल झाले असले तरी सत्ता नसताना देखील विकासकामे होवू शकतात हे माजी आमदार अशोकराव काळे यांनी जनतेला दाखवून दिले आहे. जनतेने ते अनुभवले आहे. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचेही असले तरी त्याचा विकासावर परिणाम होणार नाही. मतदारसंघाचा विकास कधीही थांबु देणार नाही. ज्या प्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक थरावर थर लावतात त्याप्रमाणे यापुढील काळात देखील मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाचे आणखी थर रचणार असल्याचे ना. काळे यांनी यावेळी सांगितले.

या दहीहंडी उत्सवामध्ये ढोल ताशांचा गजर गोविंदा पथकांचा उत्साह वाढवीत होते. अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेवून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. परंतु इगतपुरी येथील संग्राम पथक दहीहंडी पर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येवून ना. काळे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गोविंदा पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com