विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही - ना.काळे

 विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही - ना.काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

निवडून दिलेले उमेदवार तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे फिरकले नाहीत त्यामुळे तुमचे विकासाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यासाठी येणार्‍या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत मी दिलेले, माझ्या विचाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून द्या तुमच्या विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली आहे.

शहरातील हनुमाननगर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नामदार तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना ना. काळे बोलत होते. ते म्हणाले, कोपरगाव शहरातील नागरिकांचा मुख्य प्रश्न हा पाणी प्रश्न आहे. हा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या नवीन पाच नंबर साठवण तलाव व्यवस्थेसाठी 131 कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारने दिला आहे.

विकासकामांसाठी निधी आणून विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. अशाच पद्धतीने तुम्ही निवडून दिलेले उमेदवारांनी देखील विकास करणे तुम्हाला अपेक्षित होते मात्र तुमचा भ्रमनिरास झाला आहे. झालेली चूक सुधारण्याची व प्रभागाचा विकास करण्याची नामी संधी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून प्राप्त होणार आहे तुम्ही मिळालेल्या संधीतून मी दिलेले, विकासाशी बांधील असलेले, माझ्या विचाराचे उमेदवार निवडून द्या तुमच्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपस्थित नागरिकांना ना. आशुतोष काळे यांनी दिला.

याप्रसंगी मुख्याधिकारी शांतराम गोसावी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, नायब तहसीलदार माधवी गोरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे, पाणीपुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 नंबर साठवण तलावाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरच या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल. कामाचे भूमिपूजन लवकरच समस्त कोपरगावकरांच्या उपस्थितीत करू. ती आनंदाची बातमी देण्यास मी उत्सुक असून तो दिवस कोपरगावकरांसाठी व माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल.

- ना. आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com