शहरातील रस्त्यांची कामे आठ दिवसात सुरु करा

आ. काळेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
शहरातील रस्त्यांची कामे आठ दिवसात सुरु करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील नागरिक मागील अनेक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करीत आहे. या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून निधी मंजूर करून आणला आहे. मात्र आजपर्यंत या रस्त्यांची कामे सुरु झाली नसून नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे आठ दिवसाच्या आत सुरु करा, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका अधिकारी व ठेकेदारांना दिली.

शहरातील रस्ते व विविध विकासकामांबाबत आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल व ठेकेदार उपस्थित होते. आ. आशुतोष काळे यांनी अधिकार्‍यांना विकासकामांबाबत सूचना करतांना सांगितले, शहरातील नागरिकांनी खराब रस्त्यांचा आजवर त्रास सोसला आहे.

या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध असतांना देखील रस्त्यांचे काम सुरु होत नाही. त्याबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. अगोदरच 28 विकास कामांना निधी मिळून देखील ही कामे न्यायालयात गेल्यामुळे विकास कामांना उशीर झाला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसाच्या आत शहरातील ज्या रस्त्यांना निधी मंजूर आहे त्या रस्त्यांचे व या 28 कामांना देखील सुरुवात करा. ही कामे दोन महिन्याच्या आत पूर्ण करा व या रस्त्यांची कामे गुणवत्ता पूर्ण होतील याची काळजी घ्या अशा सूचना बैठकीला उपस्थित असणार्‍या अधिकारी व ठेकेदारांना दिली.

त्याबरोबरच आण्णाभाऊ साठे पुतळा तातडीने बसवा, आदिवासी सांस्कृतिक भवनच्या कामाला देखील तातडीने सुरुवात करा व अनुकंपा तत्वावरील कर्मचार्‍यांची तातडीने नेमणूक करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. तसेच कोपरगाव नगरपरिषद इमारत, भुयारी गटार, नदी संवर्धन, शुक्लेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र आदी विकास कामांना देखील लवकरात लवकर सुरुवात करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com