करोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक - आ. काळे

आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

देशात थैमान घालत असलेल्या करोनाने आपला विळखा घट्ट केला असून करोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात देखील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यापुढे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

शासनाकडून जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे सर्व छोटे मोठे व्यावसाय सुरू झाले आहेत. कोपरगाव तालुक्यात जून महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात असताना मात्र मागील एक महिन्यापासून नियमितपणे करोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या काळजी वाढवणारी आहे.

करोना बाधित रुग्णांवर एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये यशस्वी उपचार देखील केले जात आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त ताण पडत आहे. मागील काही महिन्यांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत आहेत. करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता या बाधित रुग्णांना आत्मा मलिक वसतिगृहात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर निश्चितपणे उपचार करण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होणार असला तरी भविष्यात शिर्डी येथे करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येईल.मात्र अशी वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेऊन करोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आ. काळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com