सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घेवून खरीप हंगाम यशस्वी करा

सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घेवून खरीप हंगाम यशस्वी करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गत वर्षी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे. लॉकडाऊनमुळे रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत झाला नाही. खतांचा देखील तुटवडा निर्माण होवू शकतो. या शक्यता गृहीत धरून जिल्हा कृषी अधीक्षक व महाबीजने समन्वय ठेवून कोपरगाव तालुक्यात सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही, कुठेही साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेवून खरीप हंगाम यशस्वी करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्या.

कोपरगाव तालुक्याची खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठक आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेसाठी उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, सौ. सोनाली साबळे, दिलीप शिंदे, विठ्ठल जावळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी चांगदेव जवणे, सौ. माधुरी गावडे, अविनाश चंदन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक व सहाय्यक ऑनलाईन सहभागी झाले होते. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी 2021-22 चा खरीप हंगाम नियोजन आढावा सभेत मांउला.

आ. आशुतोष काळे म्हणाले, तालुक्यातील खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी शेतकर्‍यांना अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरं जावं लागलं. यावर्षी जवळपास 98 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर्षी सोयाबीनला मिळालेला उंचांकी दर पाहता दरवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. सोयाबीन बियाणाच्या दरामध्ये यावर्षी शासनाकडून कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. तसेच 15 मे पर्यंत आहे त्या किमतीमध्ये रासायनिक खतांची विक्री करण्याच्या सरकारने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आहे.

त्या दरात रासायनिक खतांचा व बियाण्यांचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. कृषी आयुक्त यांच्या आदेशानुसार अनुदानित परमिट बियाणे घेण्यासाठी 15 मे पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत नोदणी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या लॉक डाऊन मुळे शेतकरी सेतू केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र कार्यालयात जावू शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने बियाणे परमिट देण्याची व्यवस्था जिल्हा कृषी अधीक्षक यांनी करावी. खरीप हंगामपूर्व व खरीप हंगामातील सर्व मोहिमांचे तसेच पीक कापणी प्रयोगांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करून ते संगणकीय पद्धतीने संग्रहित करावे.

जेणेकरून शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत होईल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खते बी-बियाणे यासंदर्भात शेतकर्‍याला अडचण होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करावे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीयकृत व विविध बँकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com