रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या

आमदार काळेंच्या साई संस्थान रुग्णालय प्रशासनाला सूचना
रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा द्या

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असतात. येणार्‍या प्रत्येक रुग्णाला साईबाबांनी केलेली दीनदुबळ्यांची सेवा डोळ्यासमोर ठेऊन उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा द्या, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

साईनाथ रुग्णालय व साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील सोयी-सुविधांबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच बैठक घेऊन पाहणी केली. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, साईनाथ रुग्णालय व सुपर हॉस्पिटलमध्ये येणारे बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. अशा रुग्णांना इतर मोठ्या दवाखान्यांत उपचार घेणे शक्य नसते. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक रुग्ण आरोग्य सुविधेच्या बाबतीत समाधानी होणे गरजेचे आहे. या रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या.

यावेळी हॉस्पिटलच्या अडचणी व कर्मचार्‍यांच्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन सर्व हॉस्पिटल प्रशासन कर्मचार्‍यांचे 100 टक्के लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com