
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानासाठी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी निधी मिळावा तसेच मतदारसंघातील पोलीस स्टेशन संबंधित असणार्या समस्या तातडीने सोडवा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे पोलीस स्टेशन संबंधित अनेक समस्या मांडून लक्ष वेधले. पोलीस कर्मचार्यांचे निवासस्थानाचे बांधकाम हे खूप जुने असून अतिशय जीर्ण झालेले आहे. ही पोलीस कर्मचारी वसाहत वास्तव्य करण्यास अयोग्य व तेवढीच धोकादायक आहे. तरीदेखील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावून या वसाहतीत वास्तव्य करीत आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षक, अहमदनगर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी पोलीस संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच विशेष व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, पोलीस गृहनिर्माण, वरळी या कार्यालयाकडे निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रके मान्यतेसाठी व निधी मिळणेकरिता परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे.
तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत देखील अत्यंत जीर्ण झालेली असून मोडकळीस आलेली आहे. सध्या सर्वत्र सुरू असलेले मोठ्या स्वरूपातील पर्जन्यमान पाहता या दोनही ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर इमारतीचे दुरुस्तीचे काम तातडीने करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या इमारतीच्या दुरुस्तीचा व नुतनीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव पोलीस अधीक्षक, अहमदनगर कार्यालयामार्फत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. एकूण परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून आपण याबाबत तातडीने निर्णय घेऊन बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी व जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली.