शेतकर्‍यांना दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी - आ. काळे

शेतकर्‍यांना दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा पिके उभी करण्यात झालेला खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यातील जवळपास 13 हजार 817 शेतकर्‍यांनी खरीप पिकांची विमा रक्कम भरलेली आहे. या सर्व शेतकर्‍यांना विमा कंपनीने दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून आजतागायत पाऊस सुरूच असल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडणार नाही अशी परिस्थिती आहे. सरकारकडून जरी मदत देण्यात येणार असली तरी त्या मदतीतून होणार्‍या नुकसानीची भरपाई होणार नाही. मात्र शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळेल या आशेवर खरीप पिकांचा विमा उतरवून पीक विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे भरलेली आहे. झालेल्या सर्व नुकसानीचे महसूल व कृषी खात्यामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत.

या पंचनाम्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीच्या आत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देणे बंधनकारक होते. त्यामुळे बहुतांश नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे सादर केलेली आहे. मात्र काही शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावर देऊ शकले नाही. त्यामुळे नुकसान होऊन देखील या शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाई पासून वंचित राहावे लागू शकते.

खरिपाच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची पूर्व तयारी करण्यासाठी आर्थिक अडचणी येणार असून दिवाळी सण साजरा करणे देखील शेतकर्‍यांना जिकरीचे होणार आहे. त्यासाठी विमा कंपनीने तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने जे पंचनामे केलेले आहेत. ते सर्व पंचनामे गृहीत धरून सरसकट ज्या शेतकर्‍यांनी खरीप पिकाचे विमा कवच घेतले आहे. त्या सर्व शेतकर्‍यांना सरसकट खरीप पिकाच्या विम्याची रक्कम दिवाळीच्या आत द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com