महिन्याच्या आत मंजूर कामे पूर्ण करून घ्या

आ. आशुतोष काळेंच्या ऊर्जा विभागाला सूचना
महिन्याच्या आत मंजूर कामे पूर्ण करून घ्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

ऊर्जा विभागाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आरडीएसएस, कृषी वीज धोरण, जिल्हा नियोजन समिती अशा विविध विभागातून निधी उपलब्ध आहे. ही सर्व मंजूर कामे एक महिन्याच्या आत संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्या. जे ठेकेदार वेळेत काम करणार नाही अशा कामचुकार ठेकेदारावर कारवाई करा. मात्र नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आ. काळे यांनी नुकतीच कोपरगाव येथे महावितरणच्या सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत उर्जा विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडून आढावा घेऊन शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या अडचणी या बैठकीत जाणून घेतल्या. ते म्हणाले, कृषी धोरण व जिल्हा नियोजन अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील अनेक गावांत मंजूर असलेल्या कामांपैकी बहुतांश कामे अपूर्ण असून ही कामे तातडीने पूर्ण करा.

उन्हाचा पारा वाढला आहे. अशा परिस्थितीत कृषी पंपाचे वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर शेतकर्‍यांना वीज रोहित्र लवकर मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना जनावरांसाठी पाणी कसे उपलब्ध करायचे व उभ्या चारा पिकांना पाणी कसे द्यायचे? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कृषी पंपाचे वीज रोहित्र नादुरुस्त झाल्यास तातडीने उपलब्ध करून द्या. शेतकर्‍यांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या. वादळ व अतिवृष्टीमुळे वाकलेले विजेचे पोल व लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करा.

शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून किरकोळ कामाच्या दुरुस्तीसाठी निम्म्या शहराचा वीजपुरवठा खंडित केला जातो. याबाबत योग्य उपाययोजना करा. शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात पथदिवे बसविण्याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच वारी वीज उपकेंद्राच्या क्षमता वाढ काम, ब्राम्हणगाव वीज उपकेंद्राचे सुरू असलेले काम व चांदेकसारे येथील मंजुरी प्रक्रियेत असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामांबाबत आ. आशुतोष काळे यांनी सखोल आढावा उपस्थित अधिकार्‍यांकडून यावेळी घेतला.

यावेळी काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीप बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, गोरक्षनाथ जामदार, देवेन रोहमारे, चारुदत्त सिनगर, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, भगवंत खराटे, डी. डी. पाटील, मतदार संघातील सर्व विभागाचे सहाय्यक अभियंता, तसेच विलास चव्हाण, शरद होन, सचिन होन, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, हसन सय्यद, ज्ञानेश्वर गव्हाणे, संदीप कपिले आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com