लक्ष्मीनगर अतिक्रमण नियमानुकूल करण्याला आ. आशुतोष काळेंकडून चालना
सार्वमत

लक्ष्मीनगर अतिक्रमण नियमानुकूल करण्याला आ. आशुतोष काळेंकडून चालना

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर मागील अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत असून हे नागरिक राहत असलेली जागा नियमानुकूल करून मिळावी याबाबतची या नागरिकांची मागणी होती. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पाऊल उचलत या जागा नियमानुकूल करण्यासाठी नुकतीच नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांची भेट घेऊन त्यांना या जागा नियमानुकूल करण्याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक विरेन बोरावके, राजेंद्र वाघचौरे उपस्थित होते.

निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे, शहरातील सर्वांसाठी घरे 2022 योजनेअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार कोपरगाव नगरपरिषदे मार्फत लक्ष्मीनगर झोपडपट्टीचे सर्व्हे नं. 113 व 114 मधील सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन झोपडपट्टी धारकांमध्ये या योजनेविषयी जनजागृती करून माहिती देण्यात आली आहे.

सर्वेक्षण करताना झोपडपट्टी धारकांकडून जमा करण्यात आलेल्या अर्जांची व कागद पत्रांची नगरपरिषद संचलनालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार झोपडपट्टीधारकांची पडताळणी करण्यात आली आहे. कोपरगाव नगरपरिषदेने 5 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या सदस्य समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रस्ताव ठेवला आहे.

सदर प्रस्तावामध्ये शासन निर्णयानुसार रस्ता, खुली जागा व सुविधा भूखंडासाठी लागणार्‍या जागेसाठी प्रस्तावित आराखड्यानुसार विकास नियंत्रण नियमावली मधील अटी शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला आहे.

या प्रस्तावाची आपण तातडीने दखल घेऊन या प्रस्तावास मंजुरी द्यावी व लक्ष्मीनगर भागात शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com