कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्तीवर राहतात

त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष 3054 अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नासिक येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक आराखड्या संदर्भात अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवशिष चक्रवर्ती, उपसचिव व्ही.एफ.वसावे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. या बैठकीत वाढीव प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

आ.काळे यांनी मंत्री अजित पवार यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध विकास कामांकडे लक्ष वेधून निधीची मागणी केली. सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्यास ना. पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे.