आ. काळे यांनी जनतेला वेड्यात काढण्याचा धंदा बंद करावा - काले

आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आ. आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न भिजत पडला असून आपले अपयश झाकण्यासाठी ते भुलभुलैय्या करून जनतेला संभ्रमित करत आहेत. येसगावच्या 5 नंबर साठवण तलावाचे काम अजून सुरू झालेले नाही. खोट्या बातम्या देऊन शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला, असे खोटे सांगून आ. काळे यांनी जनतेला वेड्यात काढण्याचा धंदा बंद करावा. कोपरगावची जनता मुर्ख नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि हा अपप्रचार थांबवावा, असा सल्ला भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी दिला आहे.

डी. आर. काले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील 5 नंबर साठवण तलावासाठी आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी 131 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून आणला. या निधीतून 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शहरवासियांना भविष्यात मुबलक पाणी मिळणार आहे, असे आ. आशुतोष काळे सांगत आहेत. परंतु 5 नंबर साठवण तलावाचे काम प्रत्यक्षात अजून सुरू झालेले नाही.

असे असतानाही आ. काळे आणि त्यांचे समर्थक आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ पाणी वितरण व्यवस्थेचे काम सुरू केल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. शहरात पाईपलाईन आणि टाकीच्या कामाचे भूमिपूजन केले म्हणजे पाणीप्रश्न कायमचा सुटला असे नाही. कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी आ. काळे यांच्याकडून हा अपप्रचार सुरू आहे. आ. काळे यांनी शहरवासियांना 5 नंबर साठवण तलावाचे व पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली, पण गेल्या तीन वर्षांत शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. आता मात्र ते अपप्रचार करून जनतेप्रती खोटा कळवळा दाखवत आहेत.

कोपरगाव शहराला गेल्या पाच वर्षांपासून आठ दिवसांतून फक्त एकदा पाणीपुरवठा होत आहे. गोदावरी कालव्यातून मिळणारे हे पाणी दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोपरगावला पाणीपुरवठा होणार्‍या नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाच्या क्षेत्रात यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे आता दररोज शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे, अशी कोपरगाववासियांची मागणी आहे आणि ती रास्तच आहे, परंतु दररोज पाणी देण्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून आ. काळे हे आता रविवार (31 जुलै) पासून शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगून आपलेच म्हणणे पुढे रेटत आहेत.

5 नंबरचा साठवण तलाव होऊ नये आणि कोपरगावचा पाणीप्रश्न सुटू नये, असे आम्हाला अजिबात वाटत नाही, पण 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यावर कोपरगावकरांना खरोखरच दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे का, हा आमचा सवाल आहे. 5 नंबर साठवण तलावाच्या कामाच्या नावाखाली शहराचा पाणीप्रश्न सुटल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आमचा विरोध आहे.

5 नंबर तलावाच्या कामाच्या मंजुरीसाठी लागणारे सर्व ठराव नगरपालिकेत भाजप-शिवसेना-रिपाइंच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केलेले आहेत. त्यामुळेच ही योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठवता आली. त्यावेळेस आ. काळे यांचा पालिकेतील गट अल्पमतात होता. कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नासाठी तत्कालीन नगरसेवकांनी 5 नं. साठवण तलाव आणि निळवंडे पाईपलाईन योजना मंजूर करावी, असा ठराव केलेला आहे. तत्कालीन नगरसेवकांनी घेतलेल्या ठरावामुळे तसेच नगरपालिका प्रशासनाने व काही समाजसेवकांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही योजना मंजूर झाली आहे. हे काही आपल्या एकट्याचे श्रेय नाही, परंतु आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ही योजना मीच मंजूर करून आणली,असे आ. काळे भासवत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com