रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे
सार्वमत

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलची सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली

Nilesh Jadhav

कोपरगाव | प्रतिनिधी | Kopergaon

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलची सभा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली. या सभेत रयत शिक्षण संस्थेच्या विविध विभागीय अध्यक्षांची निवड करण्यात आली असून उत्तर विभागीय अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेशी बांधिलकी ठेवून संस्थेच्या चेअरमनपदाची सलग पंधरा वर्ष जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वोतोपरी मदत केलेली आहे.

काळे परिवाराचा हा वारसा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवून रयत शिक्षण संस्थेची प्रगती करावी या उद्देशातून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्यावर टाकली आहे. सभेत इतरही चार विभाग अध्यक्षांची निवड करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे पश्चिम विभाग-अ‍ॅड. राम कांडगे, रायगड विभाग-आमदार बाळाराम पाटील, मध्य विभाग - संजीव पाटील, दक्षिण विभाग - माधवराव मोहिते यांचा समावेश आहे. या बैठकीसाठी संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,सचिव, सेक्रेटरी व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आदर्श विचारांवर कर्मवीर शंकररावजी काळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून काळे परिवाराचा वारसा पुढे चालविण्याची आमचे नेते शरद पवार यांनी जबाबदारी दिली त्याबद्दल रयत परिवाराचा अत्यंत आभारी आहे. माझ्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून टाकलेला विश्वास सार्थ ठरविल.

- आमदार आशुतोष काळे.

बोठे, कराळे यांनाही संधी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य पदावर नगर तालुक्यातील वाळकी येथील विजय उर्फ बाळासाहेब सावळेराम बोठे यांची संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवड केली आहे.

संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सदस्यपदी येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांची निवड झाली आहे.आज सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेख़ाली व चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झूम मीटिंगद्वारे संपन्न झाली. त्यामध्ये या निवडी करण्यात आल्या असून त्या पुढील तीन वर्षे कालावधीसाठी करण्यात आल्या आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com