आ. मिटकरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा

ब्राम्हण सेवाभावी प्रतिष्ठानची मागणी
आ. मिटकरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

हिंदु देवता व ब्राम्हण समाजातील पुरोहितांबद्दल तसेच हिंदू देवतांची बदनामी केल्याबाबत आ. अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी ब्राम्हण सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने पोलीस निरीक्षक संजय सानप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, आ. अमोल मिटकरी यांनी दि. 19 एप्रिल 2022 या दिवशी सांगली येथील सभेत हनुमान यांचे मारुती स्तोत्र म्हणताना मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा याचे मिश्रीत अभद्र भाषेत टिकाटिप्पणी केली. मिटकरी यांनी हिंदू विवाहातील कन्यादान या पद्धतीवर टिका केली. कोणत्याही विवाहाप्रसंगी समभाव समर्पित असे वाक्य कोणताही पुरोहित अथवा ब्राह्मण उच्चारत नाहीत पण मिटकरी यांनी त्याचा अर्थ नवरदेवाला कानात सांगितल्याचे मोघमपणे वक्तव्य केले. ब्राह्मण समाजातील पुरोहितांची टिंगल करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे स्पष्ट होत आहे.

सांगली येथील भाषणाची व्हिडीओ क्लिप तपासून बेताल वक्तव्य करणार्‍या अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

समाज बंधु भगिनींकडून उद्रेक होवून कोणतीही अप्रिय, अनुचित घटना घडल्यास त्यास कोणताही हिंदु समाजबांधव व भगिनी जबाबदार राहणार नाहीत, याची जबाबदारी शासनाची असेल. समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पुरुषोत्तम मुळे, अनिल कुलकर्णी, श्रीकांत रोटे, मोहनिराज जोशी, संजय पुराणिक, श्रीपाद गोरे, काशिनाथ सराफ, जगदीश मेगरे, महेश देशपांडे, सुनील गंधे, राहुल कुलकर्णी, कुणाल करंडे, गंगाधर जोशी, केशव आवटी, श्रीपाद मेगदे, कुणाल करंडे, शाम वैद्य गुरुजी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.