मिशन वात्सल्य करणार भिक्षेकर्‍यांचे पुनर्वसन

समितीची बैठक || करोना एकल महिलांची वारस म्हणून नोंद लागणार
मिशन वात्सल्य करणार भिक्षेकर्‍यांचे पुनर्वसन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना एकल महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी मिशन वात्सल्य समितीने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी देखील या समितींवर सोपविली आहे.

श्रीरामपूर तालुका शासकीय मिशन वात्सल्य समितीची बैठक मंगळवारी निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीच्या सदस्य सचिव व प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी मिशन वात्सल्य समितीकडे भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी सोपविणार्‍या शासन निर्णयाची माहिती दिली. याप्रसंगी अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, सहायक गटविकास अधिकारी यु.डी. शेख, पंचायत समितीचे आरोग्य सहायक बी. एल. बनसोडे, श्रीरामपूर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय आरणे, समूह संघटक हरिश पैठणे, पुरवठा विभागाचे निरीक्षक एस. यु. पुजारी उपस्थित होते.

25 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार मिशन वात्सल्य समितीकडे भिक्षेकरी पुनर्वसनाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यातील महिला, पुरुष व बालके अशा भिक्षेकर्‍यांची माहिती प्राप्त करून घेऊन अशा भिक्षेकर्‍यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जवळच्या भिक्षेकरीगृहात दाखल करणे तसेच आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, संपूर्ण तालुक्यात आढळणार्‍या मनोरुग्ण, दिव्यांग, दुर्धर आजाराने पीडित भिक्षेकर्‍यांची माहिती उपलब्ध करून घेणे, अंमली पदार्थांचे व इतर व्यसन असलेल्या भिक्षेकर्‍यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, भिक्षा मागणार्‍या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करून अशा बालकांना बालगृहामध्ये दाखल करण्याबाबतची कार्यवाही करणे अशा जबाबदार्‍या तालुका मिशन वात्सल्य समितीवर सोपविण्यात आलेल्या आहेत. याबाबत समितीने दर पंधरा दिवसांनी बैठकीत आढावा घेऊन भिक्षेकरी पुनर्वसनासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कृती दलास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील करोना मृतांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत शहरातील 48 करोना एकल महिलांची नगरपालिकेत नोंदणी झाल्याची माहिती पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय आरणे व समुदाय संघटक हरिश पैठणे यांनी या बैठकीत दिली. सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com