गृहभेटीतून जाणून घेणार करोना एकल महिलांचे प्रश्न

श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्यच्या बैठकीत निर्णय
गृहभेटीतून जाणून घेणार करोना एकल महिलांचे प्रश्न

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे घरातील कर्ता पुरूष गमावलेल्या कोरोना एकल महिलांचे प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी गृहभेटी देण्याचा निर्णय श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. समितीचे अशासकीय सदस्य व महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे उपस्थित होते. सदस्य असलेले प्रमुख सरकारी अधिकार्‍यांनी बैठकीस दांडी मारली. कृषी विभागाचे प्रतिनिधी श्रीधर बेलसरे यांनी कृषी विभागाचे कर्मचारीही काही गावे दत्तक घेणार असल्याचे सांगितले. तालुका संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्याचा तहसीलदार पाटील यांनी आढावा घेत संबंधितांना आदेश दिले.

करोना एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने मिशन वात्सल्य समित्याची तालुका स्तरावर स्थापना केली आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यात कोरोना एकल पाल्यांसह इतर अशा एकूण 300 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला आहे. तर 31 महिलांना संंजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अजूनही अनेक कोरोना एकल महिला 50 हजार रूपयांच्या सानुग्रह अनुदानासह विविध योजनांपासून वंचित आहेत.

अशा महिलांच्या अडचणी, प्रश्न समजून घेत त्यांना योजनाचे लाभ मिळवून देण्यासाठी मिशन वात्सल्य अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी बेलापूर, उंबरगाव, जपे यांनी गोंडेगाव, खैरी निमगाव, शिरसगावची पालक म्हणून जबाबदारी घेतली. स्वतः तहसीलदार पाटील यांनीही काही गावांची जबाबदारी घेतली. सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्पाधिकारी आशा लिप्टे यांनी आपण लवकरच गावे दत्तक दिलेल्या पालकांची यादी तयार करून आदेश काढणार असल्याचे सांगितले.

कोरोना एकल महिलांची रेशन व संजय गांधी योजनेची प्रकरणे रखडत असल्याकडे साळवे व जपे यांनी लक्ष वेधले. त्याची दखल घेत तहसीलदार पाटील यांनी संबंधित. कर्मचार्‍यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले.

सदस्यांच्या गैरहजेरीबाबत तहसीलदारांची नाराजी

गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी हे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी समितीचे सदस्य आहेत. पण हे सर्व जण या बैठकीस गैरहजर होते. यातील काहींनी आपले प्रतिनिधी पाठविले होते. नगरपालिकेचे तर कोणीच हजर नव्हते. अधिकार्‍यांच्या गैरहजेरीबाबत समिती अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.