भोकरच्या बेपत्ता तरुणीचा मृतदेह तिसर्‍या दिवशी विहिरीत आढळला

घातपात झाल्याचा नातेवाईकांना संशय
भोकरच्या बेपत्ता तरुणीचा मृतदेह तिसर्‍या दिवशी विहिरीत आढळला

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तीन दिवसांपूर्वी गायब झालेली तरूणी तिसर्‍या दिवशी त्यांच्याच शेतातील विहीरीत मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह काल गुरुवारी सायंकाळी विहिरीतून काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. या तरुणीचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

भोकर शिवारातील शेतकरी कुटूंबातील राजेंद्र रघुनाथ वाकडे हे खोकर- भोकर शिवरस्त्यालगत असलेल्या चव्हाण यांच्या शेडमध्ये राहतात. त्यांची थोरली मुलगी दिपाली राजेंद्र वाकडे ही 18 वर्षांची तरुणी मंगळवार दि.10 मेच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरातून गायब झाली. वाकडे कुटुंबाने मंगळवार रात्रीपासून दीपालीचा परीसरात शोध घेतला परंतु काहीही हाती न लागल्याने अखेर दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवार दि.11 मेच्या रात्री दीपालीचे वडील राजेंद्र यांनी दीपाली बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलिसांत दाखल केली.

पोलिसांनी बेपत्ताची नोंद घेवून शोध सुरू केला त्याच बरेाबर नातेवाईकही पुन्हा शोध घेतच होते. काल सायंकळी सहा वाजेच्या सुमारास दीपालीचे वडील राजेंद्र हे आपल्या गट नं.200 मधील शेतातील विहिरीची पाण्याची पातळी बघून वीजपंप बंद करण्यासाठी गेले असता विहिरीत डोकावले असता त्यांना दीपालीचा मृतदेह आढळला.

काल रात्री उशीराने मयत दिपालीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. वैद्यकीय अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल असे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी सांगितले. याप्रकरणी साखर कामगार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांचे अहवालानुसार सदर तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत.

Related Stories

No stories found.