राहुरीच्या मेंढपाळाचे गहाळ झालेले साडेतीन लाख मिळाले परत

कोतवाली पोलिसांनी दाखविली तत्परता
राहुरीच्या मेंढपाळाचे गहाळ झालेले साडेतीन लाख मिळाले परत

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - चारचाकी घेण्यासाठी राहुरीवरून नगरमध्ये आलेल्या मेंढपाळाचे साडेतीन लाख रूपये गहाळ झाले. परंतु, ही रक्कम चोरीला गेल्याची तक्रार मेंढपाळने कोतवाली पोलिसांकडे केली. पोलिसांनी तात्काळ नगर शहरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तपास सुरू केला. रक्कम असलेली पिशवी जेथे गहाळ झाली त्याच ठिकाणी ती मिळून आली. मेंढपाळला त्याची रक्कम मिळाली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महाराष्ट्र मेंढी पालन संघटनेच्यावतीने कोतवाली पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

राहुरी तालुक्यातील जांभळीचे मेंढपाळ व्यवसायिक पारस सुदाम बिचकुले (वय 28) यांना चारचाकी वाहन खरेदी करायचे होते. ते मंगळवारी रक्कम घेऊन नगरमध्ये आले. एका चारचाकी शोरूमसमोर त्यांनी साडेतीन लाख रूपये रक्कम असलेली पिशवी ठेवली. सदरची पिशवी त्याच ठिकाणी विसरून बिचकुले कोतवाली पोलिसांच्या हद्दीत आले. रक्कम असलेली पिशवी चोरीला गेल्याचे बिचकुले यांनी कोतवाली पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी बिचकुले यांनी शोरूमसमोरील एका चारचाकी वाहनावर रक्कम असलेली पिशवी ठेवली होती, ती पिशवी त्याच ठिकाणी आढळून आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे बिचकुले यांना त्यांची रक्कम मिळाली. यामुळे कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांचा पथकाचा महाराष्ट्र मेंढपाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साखाराम सरक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com