
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील खंडाळा येथून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा शोध लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. सदर दोन्ही मुली सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावात मिळून आल्या आहेत.
दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी तालुक्यातील खंडाळा येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये सायकलवर शाळेत गेलेली मुलगी परत घरी आली नाही. तिचा शाळेच्या परिसरात, तिच्या मैत्रीण व नातेवाईक यांच्याकडे चौकशी करुनही ती मिळून आली नव्हती. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावातील आणखी एक मुलगी त्याच दिवशी सकाळी शाळेत गेली पण अद्यापपर्यंत ती घरी आली नव्हती. याबाबत दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यावरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी पोसइ सुरेखा देवरे व टिळकनगर बिट चौकीचे अंमलदार यांना आदेश दिल्यानंतर खबर्यामार्फत माहिती घेतली असता सदरच्या मुली पुणे जाणार्या बसमध्ये बसून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तात्काळ मुलींच्या पालकांसह पुणे येथे रवाना झाले व पुणे बस स्टॅण्डवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन्ही मुली पुणे बस स्टॅण्डवर उतरून सातारा बसमध्ये बसल्याचे दिसून आले. सदर बसचे चालक व वाहक यांच्याकडे चौकशी केली असता या मुली सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक खंडाळा गावात गेल्यानंतर दोन्ही मुली मिळून आल्या. या मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आम्ही दोघी शाळेतून कोणाला काहीएक न सांगता निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा तपास पोसई सुरेखा देवरे, पोना साईनाथ राशिनकर, पोना रघुवीर कारखेले, पो.कॉ आंबादास आंधळे, कैलास झिने, कुलदीप पर्वत, योगीता निकम आदींनी केला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसइ सुरेखा देवरे करीत आहेत.