करोना रोखण्यासाठी नागरीकांनी नियमांसह स्वयंशिस्त पाळा- सौ. तांबे
सार्वमत

करोना रोखण्यासाठी नागरीकांनी नियमांसह स्वयंशिस्त पाळा- सौ. तांबे

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

करोना संकटाचा सामना करण्यासाठी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने मागील चार महिन्यांपासून आयएमए व निमा यांच्या सहकार्यातून राज्यात सर्वप्रथम कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोवीड तपासणी केंद्र सुरू केले.

तसेच कम्युनिटी हॉस्पिटल सुरू करून, सातत्याने हायपोक्लोराईडची फवारणी, जनजागृती, सर्वेक्षण व कर्मचार्‍यांनी अविरत सेवा देत करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नागरिकांनी विविध समारंभ टाळत शासनाच्या सर्व नियमांसह स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

करोनाच्या संकटाबाबत नागरिकांना आवाहन करताना सौ. तांबे म्हणाल्या, जगासह राज्यात आणि आपल्या तालुक्यात व शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका सुरुवातीपासून काळजीपूर्वक काम करत आहेत. करोना तपासणीसाठी राज्यात सर्वप्रथम आयएमए व निमा यांच्या सहकार्यातून कॉटेज हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम कोविड-19 तपासणी केंद्र सुरू केले व हाच पॅटर्न पुढे संपूर्ण राज्यात राबविला गेला.

याचबरोबर शहरातील सर्व डॉक्टरांच्या सहकार्याने कम्युनिटी हॉस्पिटलची उभारणी केली तसेच आझाद मंगल कार्यालयात 30 ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू केली आहे. याचबरोबर नव्याने कॉटेज हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरसह 25 ऑक्सीजन बेडची सुविधा हि सुरुवात होणार आहे.

तसेच दररोज शहरात सर्वत्र हायपोक्लोराईडची फवारणी त्याचबरोबर अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई, संपूर्ण शहरांमध्ये 40 पथकाद्वारे सर्वेक्षण, प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण, यासह गरजूंना मोफत डब्याचे वितरण क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना डबे पोहोच करणे, हायड्रोक्सी क्लोरोक्वीन व आर्सेनिक अलवा तसेच कॅम्पर गोळ्यांचे वितरण, स्वच्छतेसाठी जनजागृती अशा उपाययोजना केल्या आहेत.

करोना हे मानवजातीवरील संकट असून त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आता स्वयंशिस्त व शासनाचे सर्व नियम पाळावेत. मागील एक महिन्यापूर्वी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनेक नागरिक बिनधास्त वावरत आहेत. यातूनच करोनाचा प्रादुर्भाव वाढू पाहतो आहे.

म्हणून प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, गर्दी करणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हँड सॅनिटायझर वापरावे, याचबरोबर घरगुती होत असलेले समारंभ, लग्न समारंभ, वाढदिवस, विविध जेवणावळी हे पूर्णपणे बंद करावेत जेणेकरून करोना पूर्णपणे रोखता येईल.

आता हे संकट प्रत्येकासमोर आव्हान समजून प्रत्येक नागरिकाने या संकटाच्या लढ्यात सहभाग घेताना शासनाचे नियम पाळवे, गर्दी करणे टाळावे. मास्क वापरावे त्याचप्रमाणे स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहनही नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

संपूर्ण शहरात 40 पथकांद्वारे सर्वेक्षण प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी कोरला बाबतची जनजागृती कोविड क्लिनिक हायड्रोक्सी क्लोरोक्वीन व आर्सेनिक अल्वा तसेच कॅम्पर गोळ्यांचे वितरण दुर्बल घटकांना फुड पॅकेज वितरण कोरंटाइन असलेल्या व्यक्तींना डबे पोहोच करणे कॉटेज हॉस्पिटलमध्ये तपासणी सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी केल्या जात आहेत तसेच सर्व कर्मचारी कोरणा संकटात 24 तास आपली सेवा देत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com