लाखो रुपयांचा गैरव्यवहार : फरार माजी सरपंच प्रशांत फटांगरे अटकेत

लाखो रुपयांचा गैरव्यवहार : फरार माजी सरपंच प्रशांत फटांगरे अटकेत

संगमनेर (प्रतिनिधी) / Sangamner - सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामसेवकाच्या मदतीने 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार करणारा सारोळे पठारचा तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांना तब्बल पाच महिन्यानंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी रात्री फटांगरे आपल्या मूळगावी आल्याची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी त्याला अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सारोळेपठार ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा मोठ्या रकमेचा अपहार झाल्याबाबत एका व्यक्तीने संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गटविकास अधिकार्‍यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करुन चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करुन सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता व अपहार केल्याचा अहवाल 31 जुलै 2020 रोजी गटविकास अधिकार्‍यांना सोपविला होता.

यानंतर या दोघांनाही वेळोवेळी नोटीसा बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. सरपंच फटांगरे यांनी यासर्व नोटीसांना केराची टोपली दाखवली, मात्र ग्रामसेवक शेळके यांनी 1 ऑक्टोबर रोजी आपले म्हणणे सादर केले. त्याची पडताळणी करुन 10 नोव्हेंबर रोजी समितीने अंतिम अहवाल सादर केला. त्यात शासनाने ज्याबाबींसाठी निधी दिला होता त्याचे अंदाज पत्रक घेणे, मुल्यांकन करुन घेणे, त्याला मासिक सभेत ग्रामपंचायतीची मंजूरी घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन संगनमताने वरील कालावधीत सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार 155 रुपयांचे धनादेश स्वतःच्या नावाने काढले आणि संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा अपहार केला.

तसेच लोकसेवक असलेल्या ग्रामसेवक सुनील शंकर शेळके याने 4 लाख 66 हजार 626 रुपयांसह संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 9 लाख 8 हजार 191 रुपयांचा धनादेश काढून त्याचा अपहार केला. वरील कालावधीत सरपंच प्रशांत फटांगरे याने तब्बल 82 वेळा तर ग्रामसेवक शेळके याने 24 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून सारोळे पठार गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा गैरव्यवहार केला. वारंवार धनादेशाद्वारे इतकी मोठी रक्कम काढली जावूनही पंचायत समितीला या गैरव्यवहाराचा थांगपत्ता लागला नव्हता.

याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचा तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व लोकसेवक (ग्रामसेवक) सुनील शेळके या दोघांविरोधात फसवणूक व अपहार केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते.

तब्बल पाच महिने फरार असलेला प्रशांत फटांगरे रविवारी रात्री सारोळेपठार येथे आल्याची माहिती घारगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी प्रशांत फटांगरे यास अटक केली. फरार झालेल्या तत्कालीन सरपंचाला अटकेपासून वाचवण्यासाठी एका माजी सदस्यानेही जोर लावला होता, मात्र त्याचा कोणाताही फायदा झाला नाही, आता पोलीस ग्रामसेवकाच्या मागावर आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com