मिरी-तिसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 155 कोटी

प्रशासकीय मान्यता, लवकरच टेंडर
मिरी-तिसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 155 कोटी

करंजी |वार्ताहर| Karanji

राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मिरी तिसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 155 कोटी निधी मिळाला असून यास नुकतीच प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 155 कोटी खर्च येणार असून या योजनेला दि .16 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती. मिरी-तिसगाव व इतर 33 गावांकरिता वरदान ठरणार्‍या या पाणी योजनेस आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच निविदा प्रक्रीया होऊन कार्यारंभ आदेश होणार आहेत.

या कामामुळे मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव व इतर 33 गावांतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. या पाणी योजनेत नव्याने काही जलकुंभ उभारण्यात येणार आहेत यामध्ये चिचोंडी, करंजी, लोहसर, मांडवे, मोहोज बु., मोहोज खु., रेणुकाईवाडी, रुपेवाडी ,शिराळ, तिसगाव, त्रिभुवनवाडी, धारवाडी, कडगाव, कौडगाव, निंबोडी, देवराई, घाटशिरस, डमाळवाडी, खांडगाव, जोहारवाडी, सातवड, शिरापूर, करडवाडी व नगर तालुक्यातील पांगरमल,मजलेचिंचोली तसेच राहुरी तालुक्यातील कात्रड व गुंजाळे आदी गावांत नव्याने जलकुंभ उभारणी होणार आहे.

मिरी तिसगाव पाणीपुरवठा योजनेसाठी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लागला आहे. निधीला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामांना सुरुवात होईल. या योजनेसाठी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी मंत्री तनपुरे यांचेकडे वारंवार बैठका घेऊन प्रश्न धसास लावण्यासाठी आग्रह धरलेला होता या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने व काही नवीन गावांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याने अनेकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हमखास सोडवणार, असा विश्वास ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना दिला होता. तो शब्द खरा करण्यासाठी सातत्याने मंत्री तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तिसगावसाठी स्वतंत्र लोखंडी पाईपलाईन टाकून पिण्याचे पाणी मिळणार असून तिसगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे मार्गी लागेल लवकरच टेंडर निघून कामाला सुरुवात देखील होईल, असा विश्वास सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.