मिरी, तिसगाव प्रादेशिक नळ योजना बंद

कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने काम बंद आंदोलन
मिरी, तिसगाव प्रादेशिक नळ योजना बंद

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी व नगर तालुक्यातील 33 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या कर्मचार्‍यांचे गेल्या चार महिन्यापासून पगार थकल्यामुळे या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ही योजना पंधरा दिवसापासून बंद झाली असून अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली आहे.

प्रशासनाने तात्काळ या कर्मचार्‍यांच्या पगाराची व्यवस्था करून ही नळ योजना पूर्व सुरू करावी अशी मागणी ेप्रामुख्याने पालवे यांनी केली आहे. पावसाळ्यामध्ये या योजनेच्या पाण्याची काही लाभधारक गावांना गरज भासत नसली तरी देखील त्यांनी या योजनेची पाणीपट्टी भरण्यास सहकार्य केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक लाभधारक गावाने प्राधान्याने या योजनेचे पाणी घेतले पाहिजे तरच ही योजना सुरळीत चालू शकते.

कर्मचार्‍यांचे पगार थकल्यामुळे योजना बंद करण्याची वेळ आल्याने लाभधारक गावांना पंधरा-वीस दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ संबंधित कर्मचार्‍यांचे पगार करून ही योजना पूर्ववत सुरू करावी अशी मागणी पालवे यांनी केली आहे.

33 गावांपैकी केवळ बारा गावे पाणी घेत आहेत त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यास अडथळे येत असून पावसाळ्याच्यामध्ये खर्च जादा आणि वसुली कमी अशी परिस्थिती निर्माण होते लवकरच पाणीपट्टी वसूल करून दोन-चार दिवसात कर्मचार्‍यांचे पगार देण्याची व्यवस्था करू.

- भाऊसाहेब सावंत, सचिव, मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com