मिरी-तिसगाव व बुर्‍हाणनगर पाणी योजना त्वरीत सुरू करण्याचे निर्देश

ना. प्राजक्त तनपुरेंची आढावा बैठक; जलजीवन मिशनमध्ये समावेशाची चर्चा
मिरी-तिसगाव व बुर्‍हाणनगर पाणी योजना त्वरीत सुरू करण्याचे निर्देश

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पाथर्डी तालुक्यातील मिरी -तिसगाव पाणीयोजना व बुर्‍हाणनगर इतर गावे पाणीयोजनेच्या थकीत वीजबिलाअभावी योजना बंद होती. ही योजना चालू करण्यासाठी अहमदनगर येथे शासकीय विश्रामगृहावर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी मिरी-तिसगाव व बुर्‍हानगर इतर गावे प्रादेशिक पाणीयोजनेच्या थकीत वीजबिलाबाबत चर्चा करण्यात आली. थकीत वीजबिलापैकी काही रक्कम त्वरीत भरावी, असे योजनेचे सचिव तथा गटविकास अधिकारी यांना सूचना करून महावितरणच्या अधिकार्‍यांना दोन्ही योजनेचा खंडित झालेला विद्युतपुरवठा सुरू करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले. यावेळी मिरी-तिसगाव पाणी योजनेचा जलजीवन मिशन मध्ये समावेश करण्याविषयी चर्चा झाली.

यावेळी पाथर्डीचे गटविकास अधिकारी, मिरी-तिसगाव योजनेचे सचिव, संबंधित गावातील सरपंच, नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बुर्‍हाणनगर योजनेचे सचिव, जि.प.सदस्य शरद झोडगे, काशिनाथ लवांडे, रोहिदास कर्डिले, रघुनाथ झिने, माजी पंचायत समिती सदस्य रामदास भोर, राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके आदी उपस्थित होते.

बुर्‍हाणनगर व इतर योजनेतील नागरदेवळे येथे पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या. त्वरीत कार्यवाही न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री तनपुरे यांनी दिले. तसेच मिरी-तिसगाव व बुर्‍हाणनगर पाणीयोजना त्वरीत सुरू करण्याचे निर्देश महावितरण अधिकारी यांनाही मंत्री तनपुरे यांना दिले.

पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाच्या बैठकीस बुर्‍हाणनगर व नागदेवळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पाठ फिरविल्याने कोणतेही गांभीर्य घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक योजनेतील अडचणींचा पाढा वाचण्याची संधी असताना गैरहजर राहून नागरिकांची प्रतारणा केली असल्याचे बैठकीनंतर बोलले जात होते.

Related Stories

No stories found.