मिरीच्या सरपंचांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती

मिरीच्या सरपंचांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गावच्या सरपंच सुनंदा राहुल गवळी यांनी सायंकाळच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी पेशंट रुग्णालयात तर डॉक्टर कर्मचारी घरी अशीच काहीशी परिस्थिती आढळून आल्याने सरपंच गवळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न थांबल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सरपंच गवळी यांनी पाथर्डी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित असतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांची गैरसोय होते ,अशा तक्रारी गावासह परिसरातील रुग्णांकडून व्यक्त करण्यात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती व आरोग्य कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच सर्वांनी मुख्यालयी थांबावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.त्यानंतर दोन दिवसांनी सरपंच गवळी यांनी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेट दिली असता काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने सरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सात दिवसांत या आरोग्य विभागात सुधारणा न झाल्यास व सर्व कर्मचारी मुख्यालयी राहण्याची व्यवस्था न केल्यास पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी उपसरपंच संजय शिंदे, जालिंदर गवळी, सुभाष गवळी, अदिनाथ सोलाट, संभाजी झाडे, विजय गुंड, सुनील औताडे, बाप्पू मिरपगार, आदिनाथ वाघ आदी उपस्थित होते.

जे आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत अशा चार कर्मचार्‍यांना नोटीस देण्यात आली असून रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबत निश्चित दक्षता घेण्याचे काम केले जाईल.

- डॉ. एच. एम. गाडे. (आरोग्य अधिकारी मिरी)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com