मिरीच्या विद्युत उपकेंद्रावर उद्या मोर्चा

माजी उर्जामंत्री तनपुरे विचारणार जाब
मिरीच्या विद्युत उपकेंद्रावर उद्या मोर्चा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

भाजपचे सरकार येताच पुन्हा विजेचा प्रश्न गंभीर बनला असून विद्युत रोहित्रांचे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत. गाव, वाडी, वस्त्यांवर कुठेही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. सिंगल फेज देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोक रात्रीच्यावेळी अंधारात चाचपडत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी (दि. 31) सकाळी नऊ वाजता मिरी विद्युत उपकेंद्रांवर शेतकर्‍यांसह धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी ऊर्जामंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये राज्यात राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेस पक्षाचे एकत्रित महाविकास आघाडीचे सरकार होते त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये वाडी वस्तीवर राहणार्‍या शेतकर्‍यांना नियमित सिंगल फेजद्वारे वीजपुरवठा करण्यात येत होता. राज्यात सत्ता बदल झाला आणि गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील सिंगल फेज बंद करण्यात आली असून वीजपुरवठा देखील सातत्याने खंडित होत आहे. विजेच्या प्रश्नाकडे नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे बिलकुल लक्ष नाही. यामुळे हा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आ. तनपुरे रविवारी वांबोरी चारीचे पाणी कुठपर्यंत पोहोचले याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर आले, असता अनेक शेतकर्‍यांनी त्यांना भेटून सिंगल फेजचा प्रश्न मार्गी लावा. दोन महिन्यांपासून सिंगल फेज बंद आहे. आमच्या मुलांना अभ्यास करता येत नाही. वन्य प्राण्यांसह चोरांची भीती वाटते. त्यामुळे सिंगल फेज पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी अनेक शेतकर्‍यांनी आ. तनपुरे यांच्याकडे केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com