मिरीत तिरंगी लढतीची शक्यता

निवडणुकीत तरुणांच्या एंट्रीची चर्चा : एकूण पाच प्रभागांतून पंधरा सदस्य निवडले जाणार
मिरीत तिरंगी लढतीची शक्यता

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या मिरी ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यादृष्टीने स्थानिक पुढार्‍यांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मिरी ग्रामपंचायतीमध्ये साडेचार हजार मतदार असून पाच प्रभाग आहेत. यातून 15 सदस्यांना निवडून द्यावयाचे आहे. निवडणुकीच्या माध्यमातून गावातील अनेक तरुणांची राजकीय एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मागील पंचवार्षिकला सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी होते. तरीही इतर प्रवर्गातील व्यक्तींनी चार वर्षे सरपंचपद पदरात पाडून घेतले. त्यामुळे पाच वर्षात मिरी गावाला तीन सरपंच पहायला मिळाले. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्वच स्थानिक पुढार्‍यांना प्रत्येक सदस्य सरपंच पदाचा दावेदार म्हणूनच निवडणूक करावी लागणार आहे.

यंदाची निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून यामध्ये मिरीचे पोपटराव गवळी, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ झाडे, माजी सरपंच संतोष शिंदे, शिवसेनेचे नेते भागिनाथ गवळी, आसाराम भगत, संजय नवल, नामदेव दारकुंडे, डॉ. बबनराव नरसाळे, संभाजी दारकुंडे, रेवजी कोरडे, बापूसाहेब कोरडे, वसंत कोरडे, विजय गवळी, या प्रमुख नेतेमंडळीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभा केला जाणार आहे.

त्याचबरोबर गावचे माजी सरपंच साहेबराव गवळी, माजी उपसभापती महादेव कुटे पाटील, माजी उपसरपंच अण्णासाहेब शिंदे, राजू इनामदार, जाकीर पटेल, आदिनाथ तागड, आसाराम भगत, रंभाजी गुंड, भाऊसाहेब तोगे, काळू मिरपगार, अशोक झाडे यांच्यावतीने देखील स्वतंत्र पॅनल उभा केला जाणार आहे. मिरी पंचायत समिती गणाचे सदस्य राहुल गवळी हे देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून गवळी यांच्यासोबत चेअरमन नंदू बनकर, ग्रामपंचायत सदस्य बंडू झाडे, विजय गुंड, माणिकराव गवळी, राजू शेख, नरवडे सर यांच्यावतीने पॅनल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आत्तापर्यंत इतरांनी किती विकास केला, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे एकदा आम्हाला मतदारांनी संधी द्यावी, या निवडणुकीत सुशिक्षित तरुणांना प्राधान्य दिले जाणार असून त्यांना या निवडणुकीत उतरून गावचा विकास करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे राहुल गवळी यांनी सांगितले.

कुरघोड्याच्या राजकारणामुळे गावच्या विकासाला खीळ बसत गेली. त्यामुळे या निवडणुकीत सर्व समाजातील समविचारी लोकांना बरोबर घेऊन गावचा पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करण्यासाठी व येथील बाजारपेठ नावारूपाला आणण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले.

गाव पातळीवर राजकारण करत असताना गावाचे गावपण टिकवून ठेवण्याचा देखील आम्ही सातत्याने प्रयत्न केला. यापुढील काळातही गावातील ज्येष्ठांबरोबरच तरुणांना देखील सोबत घेऊन या गावाला चांगले विचार आणि सर्व समावेशक विकास कार्य करण्यासाठी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे साहेबराव गवळी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com