करंजी |वार्ताहर| Karnaji

पाथर्डी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आणि जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक मतदार असलेले गाव म्हणून ओळख असलेल्या

मिरी ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीमध्ये गावातून तिरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने स्थानिक पुढार्यांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंचायत समिती सदस्य राहुल गवळी व माजी सरपंच संतोष शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव कुटे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सोलाट यांच्यादृष्टीने ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. त्यादृष्टीने या प्रमुख नेते मंडळींसह येथील अनेक ज्येष्ठांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता असली तरी या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी स्पष्ट चर्चा आजपासूनच गाव पातळीवर सुरू झाली आहे. असे असले तरी ज्या गटाची सत्ता ग्रामपंचायतीवर येईल. त्या गटाचा नेता जिल्हा परिषदेसाठी दावेदार ठरणार आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून लढवली जाणार असल्याचे चित्र आहे आणि त्यादृष्टीने येथील राजकीय रणनिती देखील सुरू झाली आहे.

प्रत्येक वॉर्डात तगडा उमेदवार देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गटाचाच झेंडा ग्रामपंचायतीवर फडकायचा या भूमिकेने येथील राजकीय नेते मंडळी तयारीला लागले आहेत. निवडणुकीला उभे राहणार्यांची भाऊगर्दी अधिक असल्यामुळे एका वॉर्डात एक दोन डझन उमेदवार उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात तीनही पॅनल प्रमुखांना एकत्र बसून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना नेते एकनाथ झाडे यांनी म्हटले आहे.

याठिकाणी युती महाविकास आघाडीचा विषय पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आला असला तरी मिरी ग्रामपंचायतीमध्ये एकूण साडेचार हजार मतदार असून पाच प्रभाग आहेत. त्यामधून 15 सदस्यांना निवडून द्यायचे आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गावातील अनेक तरुणांची राजकीय एन्ट्री होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वीच एक दुसर्याचे प्रभावी ठरणार्या उमेदवारांची पळवापळवी सुरू झाल्याने मिरी ग्रामपंचायतक्षच्या निवडणुकीकडे परिसरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीवरच जिल्हा परिषद निवडणुकीचे अंदाज लावले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे.