मिरीत भर दिवसा साडेसात लाखांची घरफोडी

कर्डिलेंनी पोलीस अधिकार्‍यांना खडसावले
मिरीत भर दिवसा साडेसात लाखांची घरफोडी

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मंगळवारी (दि.30) भर दुपारी बंद घराचे कडी कोयंडा तोडून सुमारे सात लाख 35 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने मिरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पाथर्डीच्या पोलीस अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की मिरी शंकरवाडी रोडवर आदिनाथ तागड यांची वस्ती असून तागड कुटुंब मंगळवारी सकाळी दहा वाजता घरातील कामे उरकून ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते शेतातील कामे उरकून ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले असता घराच्या पाठीमागील दरवाजा कडी कोंड्यासह तोडलेला त्यांच्या लक्षात आला त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटाची उचकपाचक झाल्याचे लक्षात आले. कपाटात ठेवलेले सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाची संपर्क साधला व घडलेल्या घटनेचा प्रकार त्यांना सांगितला.

पोलीस पथकासह स्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळी येऊन अज्ञात चोरट्यांच्या तपासाच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. बुधवारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आदिनाथ तागड यांच्या वस्तीवर येऊन या घटनेची माहिती घेतली. ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर कर्डीले यांनी उपस्थित पोलीस अधिकार्‍याची चांगलीच कान उघडणी केली व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून अशा घटना पुन्हा होऊ नयेत याबाबत पाथर्डी पोलिसांना सूचना करण्याची विनंती केली.

ग्रामस्थांकडून संताप

मागील काही दिवसापूर्वी चांगदेव तुपे यांच्या घरातून देखील दहा ते बारा तोळे सोनं भर दिवसा चोरीला गेले. जयदीप गवळी यांची मोबाईल शॉपी फोडून अनेक मोबाईल चोरीला गेले, गावात अनेक चोर्‍यांचे प्रकार घडले मात्र एकाही चोरीचा तपास पोलिसांकडून लागलेला नाही असे म्हणत ग्रामस्थांनी देखील संतप्त भावना व्यक्त केल्या

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com