अल्पवयीन मुलांकडून प्रवाशांची लुटमार

एलसीबीने दोघांना घेतले ताब्यात: त्यांचा मोहरक्याही गजाआड
अल्पवयीन मुलांकडून प्रवाशांची लुटमार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यामध्ये रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा मोरक्यालाही पोलिसांनी अटक केेली आहे. पंकज अशोक कळमकर (वय 18 रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या एकाचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार अल्पवयीन असून त्यांना ढवळगाव व तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले आहे.

6 जूनच्या रात्री बाबासाहेब गबाजी नरोडे (वय 65 रा. सिद्धेश्वरवाडी ता. पारनेर) हे पानोली रोडने सिद्धेश्वरवाडीकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडील दुचाकी, रोख रक्कम, मोबाईल असा 76 हजारांचा ऐवज लंपास केला होता. नरोडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशीच दुसरी घटना 9 जूनच्या रात्री घडली होती. गोरख चंदन पवार (रा. सारोळा कासार ता. नगर) हे सुपा एमआयडीसीतून घरी जात असताना त्यांना तिघांनी अडवून मारहाण करत लुटले होते.

याप्रकरणी तिघांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्हे पंकज कळमकर याने अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, कर्मचारी नानेकर, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, शंकर चौधरी, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित यमूल, आकाश काळे, बबन बेरड यांच्या पथकाने पंकज याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com