सार्वमत संवाद : गौणखनिजातील ‘अडथळे’ मोडून काढणार

महसूल प्रशासनाचा निर्धार
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैध गौणखनिज वाहतूक, तस्करी विरोधात महसूल प्रशासन राबवत असलेल्या धोरणात काही ढूढाचार्य अडथळे निर्माण करत आहेत. अडथळ्यांची ही अडचण मोडून काढत नागरिकांसाठी पारदर्शी, सुलभ व्यवस्था उभी करण्यात येत आहे. आधलनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत वाळूतस्कर, अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. पुरावा न देणार्‍या वाळू साठ्यावरून दंड करण्यास प्रशासन कोणतीही कुचराई करणार नाही, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली.

‘सार्वमत-नगर टाईम्स कार्यालयातील ‘श्रीं’ ची आरती अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी यांच्या हस्ते गुरूवार सायंकाळी झाली. त्यानंतर सार्वमत संवादमध्ये मापारी बोलत होते. यावेळी नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी म्हणाले, जिल्ह्यात महसूल विभागाकडून स्वस्त वाळूचे 12 डेपो तयार करण्यात आलेले आहेत. याठिकाणी 600 रुपये ब्रास वाळूची किंमत असली तरी वाहतूक खर्चासह त्याची किंमत 1 हजार रुपये ब्रासपर्यंत जात आहे. लोकांना सहजासहजी वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत वाळू आणि गौणखनिजाच्या तस्करीवर नियंत्रण आणले जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नगर-पुणे मार्गावर सुपा टोल नाका याठिकाणी ‘एआय’ (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) प्रणालीचा वापर करत वाहन स्कॅन करून गौणखनिज वाहतूक शोधली जात आहे. संबंधित वाहनांच्या डेटाबेसच्या माध्यमातून वाहनमालकांंपर्यंत पोहचून अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍यांना दंड करण्यात येत आहे. यापूर्वी अवैध गौणखनिज वाहतुकीमध्ये खोटे नाव सांगून सुटका करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, आता ते शक्य नाही.

आठ महिन्यांपासून सुपा टोल नाक्यावरून येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक वाहनाचा गौणखनिज वाहतूक डिटेक्ट करण्यासाठी स्कॅनिंग केली जात आहे. यासाठी विशेष कक्ष कार्यान्वित आहे. 15 जानेवारीपासून आतापर्यंत या मार्गावर 40 हजार वाहनांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी वॉर रूम कार्यरत असून तेथून नियंत्रण करण्यात येत आहे. असा प्रयोग राज्यात बहुदा नगर जिल्ह्यातच होत असून लवकर तो नाशिक-पुणे रोड, औरंगाबाद रोडवर असणार्‍या टोलनाक्यावर राबवण्यात येणार आहे. यासाठी महाखनिजमधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न आहेत.

खाणपट्ट्यातून काढण्यात येणारी खडी, नदी पात्रातील वाळू कोठून निघाली, कोठे चालली, सद्य स्थितीत ती कोठे आहे, यावर जीपीएस प्रणालीव्दारे नजर ठेवता येत आहे. यामुळे आता अवैध वाळू, गौणखनिजाच्या विरोधात रात्रीच्यावेळी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जावून कारवाईची गरज नाही. ड्रोनच्या माध्यमातून अवघड ठिकाणी लपवलेले गौणखनिज शोधले जात आहे. आता आपल्या घरासमोर पडलेल्या वाळूचा हिशोब द्यावा लागणार आहे.

ड्रोन तंत्रज्ञान

नदीपात्र अथवा नदी काठावर असलेल्या वेड्या बाभळींच्या जंगलात वाळूसाठे लपवण्याचे प्रकारही प्रशासनाने शोधून काढले आहेत. काही ठिकाणी तर माणसांना पायी जाणे अवघड आहे. अशा ठिकाणी अवैध वाळू साठे रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. गौणखनिज, वाळू तस्करीविरोधात ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरल्याचे मापारी म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com