दोन अल्पवयीन मुलींना धमकी देवून धर्मांतरासाठी दबाव व असभ्य वर्तन

उंबरेच्या दोन महिलांसह 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल
दोन अल्पवयीन मुलींना धमकी देवून धर्मांतरासाठी दबाव व असभ्य वर्तन

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील दोन महिलांसह आठ आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना बदनामीची, आत्महत्येची धमकी देऊन मुस्लिम धर्मात या, मुस्लिम मुला-मुलींशी संबध ठेवा व मुस्लिम मुलींसारखे वागा असे सांगून मुस्लिम मुलांशी बळजबरीने ओळख करून देऊन या पीडित मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास प्रवृत्त केले. या घटनेबाबत दोन महिलांसह आठ जणांवर दोन वेगवेगळ्या फिर्यादीनुसार विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या घटनेतील आरोपी आवेज निसार शेख व कैफ शेख हे जानेवारी 2021 ते ऑक्टोंबर 2021 या दरम्यान एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करत होते. दरम्यान आरोपी आवेज शेख याने त्या अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तिच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर तुम्ही खुप छान दिसता, माझे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या शिवाय मी राहु शकत नाही. असे म्हणून त्या मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तिला वारंवार इनस्टाग्रामवर मेसेज करुन तुम्ही आमचे मुस्लिम धर्मात या, मुस्लिम धर्मात आल्यावर तुम्हाला आम्ही बुरखा घालायला देऊ. बुरखा घातल्यानंतर हिंदू मुले तुम्हाला त्रास देणार नाही व तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. मुस्लिम धर्मात आल्यानंतर तुम्हाला बांगड्या, कुंकू, टिकली लावता येणार नाही. तुम्हाला मुस्लिम मुलीसारखे वागावे लागेल, असे सांगण्यात आले.

तर आरोपी हिना शेख हिने त्या मुलीस सांगितले की, तुम्ही नेहमी हिंदी मध्ये बोलत जा. मुस्लिम मुला-मुलींशी बोलत जा. त्याने मैत्री वाढेल. आता तुम्हाला इथून पुढे आमच्या सारखे वागायचे व रहायचे आहे. असे वारंवार बोलून आवेश शेख याच्याशी बोलण्यास त्या मुलीला प्रवृत्त केले. तसेच एका अल्पवयीन आरोपी मुलीने त्या मुलीस फोन करून वेळोवेळी आरोपी आवेज शेख याच्यासोबत बोलणे करुन देऊन तिला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना गुन्हा करण्यास इतर आरोपींनी मदत केली. या अल्पवयीन पिडीत मुलीने 28 जुलै 2023 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी आवेज निसार शेख, कैफ शेख, सोहेल शेख, हिना शेख, सलिम पठाण, अल्ताफ शेख, शाकिर सय्यद व एक अल्पवयीन मुलगी सर्व रा. उंबरे ता. राहुरी. या आठ जणांवर भादंवि कलम 354, 354 (ड), 109, 34 बालकांचे लैगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहेत.

दुसर्‍या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2021 ते दि. 26 जुलै 2023 या कालावधीत आरोपी आवेज शेख हा पीडित मुलीचा क्लासला जात असताना पाठलाग करत असे. तिला थांबवून ‘तू मला खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे’. असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा. पीडित मुलगी क्लासमध्ये गेल्यावर तेथील आरोपी महिला शिक्षिका हिना शेख ही मुलीला तुम्ही मुस्लिम मुला-मुलींशी बोलत जा. असे सांगून आरोपी आवेज शेख यांच्याशी जाणीवपूर्वक बोलायला लावून त्यास फुस दिली. त्यानंतर आरोपी आवेज शेख याने पिडीत मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर व फोनवरून तिला मी माझा हात कापून घेईल व माझा जिव देईल. तुला व तुझ्या घरच्यांना गुंतवेल. अशी धमकी देवुन तिच्याशी बळजबरीने ओळख केली. त्यानतंर आरोपी आवेज शेख व कैफ शेख यांनी फिर्यादीचा मोटारसायकलवर पाठलाग करुन तिला पुन्हा धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी मुलीला थांबवून तू आवेश शेख यांचेशी मैत्री कर. तो तुझ्याशी लग्न करेन, आम्ही तुमचे लग्न लावुन देऊ, सगळा खर्च आम्ही करु, तुझ्या वर्गातील मुलींसोबत ओळख करून दे, आम्ही त्यांच्याशी लग्न करु असे म्हणाले.

त्यानंतर तू हिंदू धर्म सोड, आमचे मुस्लिम धर्माचा स्विकार कर, तू बुरखा घालत जा, म्हणजे हिंदू मुले तुला त्रास देणार नाहीत. त्यांची वाईट नजर तुझ्यावर पडणार नाही. तू बांगड्या घालत जावू नकोस. कपाळावर गंध व टिकली लावत जावू नको. मला ते आवडत नाही. आमच्या मुस्लिम धर्माच्या मुली जशा राहतात, तशा राहत जा. आपण लवकर घर सोडून पळून जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला इतर लोक पैशासह सर्व मदत करणार आहेत. असे सांगून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर एक दिवस रात्रीचे वेळी पीडित मुलीच्या घराच्या पाठीमागे येवून तिच्या सोबत फोटो काढून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या बाबत पीडित 15 वर्षीय मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आवेज शेख, कैफ शेख, हिना शेख, सोहेल शेख, शाकिर सय्यद, सलिम पठाण, हुसेन ऊर्फ भैय्या शेख, अल्ताफ शेख, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी यांच्याविरुध्द भादंवि कलम 353, 354 (ड), 109, 34 बालकांचे लैगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 8,12 प्रमाणे विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com