
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोटच्या अल्पवयीन मुलीवर (वय 14) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिचा हात पिरगळला. तिच्यावर 15 एप्रिल 2022 रोजी दुपारी पुणे येथे अत्याचार केला. त्यानंतर 12 जून 2022 रोजी सायंकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहीरवाडी शिवार (ता. नगर) येथील जंगलात तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना आई व बहिणीला सांगितल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या आईने मानसिक आधार दिल्यावर तिने गुरूवार, 15 डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडितेच्या बापाविरोधात भारतीय दंड संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे आदींनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.