
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेेत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. तसेच पीडित मुलीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना शहरात घडली आहे. ऑगस्ट 2022 व ऑक्टोबर 2022 मध्ये ही घटना घडली असून शनिवार (दि.11) रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरूध्द अत्याचार व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. शुभम महादेव बडे (रा. एकविरा चौक, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलीची शुभम बडेसोबत ओळख होती. त्यांच्यात सोशल मीडियावरून संभाषण होत होते. या ओळखीचा फायदा घेत शुभमने तिला 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी तिच्या कॉलेजमधून दुचाकीवर बसवून सावेडीतील एका कॅफेमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखविले. मोबाईलमध्ये दोघांचे एकत्रित फोटो काढले.
त्यानंतर शुभमने पीडित मुलीला धमकी दिली की, तू जर झाल्या प्रकाराबाबत घरी कोणाला सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना मी मारून टाकीन’, असे म्हणाल्याने पीडितेने भितीपोटी घरी कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2022 रोजी शुभमने पीडितेला माळीवाडा येथे एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. 19 ऑक्टोबर 2022 रोजी शुभमने, ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, तू मला भेटण्याकरिता ये नाहीतर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन, तुझे फोटो व्हायरल करीन’ अशी धमकी देऊन सावेडीतील कॅफेवर नेले व तेथे पुन्हा अत्याचार केला.
दरम्यान सदर प्रकाराबाबत पीडितेला खुप भीती वाटत असल्याने तिने शुभम सोबतचे बोलणे व भेटणे पूर्णपणे बंद केले. त्यानंतर शुभम हा पीडितेला फोन करून भेटण्यासाठी बोलवत होता. परंतु तिने त्यास नकार दिला असता तेव्हा तो फोटो व्हायरल करिन तसेच आई वडीलांना मारून टाकील अशी धमकी देत असल्याने पीडितेने झालेला प्रकार घरी सांगितला. तिच्या आईसह तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. शुभम बडे विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.