
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 12) नगर शहरात घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या बहिणीने बुधवारी (दि. 13) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या 17 वर्षीय बहिणीकडे तिच्या दोन मैत्रिणी (एकीचे वय 15 वर्ष व दुसरीचे वय 14 वर्ष) नेहमी येत असतात. फिर्यादीची बहिण व 15 वर्षीय मुलगी एका शाळेत असून 14 वर्षीय मुलगी दुसर्या शाळेत शिक्षण घेते. दरम्यान, त्या तिघी शाळेत जाताना सोबत जात असतात. त्या सकाळी पावणे अकरा वाजता शाळेत जातात व सायंकाळी सहा वाजता घरी येतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्या तिघी शाळेत गेल्या होत्या.
सायंकाळी साडे सहा वाजले तरीही त्या शाळेतून घरी आल्या नसल्याने फिर्यादी यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता त्या शाळेत आल्या नसल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस मुलींचा शोध घेत आहेत.