
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत चाळे करत असताना काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून मुलीची बदनामी केल्याचे समोर आले आहे. उपनगरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून निशांत शेलार (रा. केडगाव) याच्याविरूध्द मंगळवारी (दि. 4) कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलीची निशांत सोबत ओळख होती. ओळखीमुळे फिर्यादीने तिच्या इंस्टाग्रामचा आयडी व पासवर्ड निशांत याला सांगितला होता. दरम्यान, फिर्यादी मुलीला निशांत याने केडगावातील एका कॅफेमध्ये नेले होते. तेथे त्याने फिर्यादीसोबत अश्लिल चाळे केले होते.
चाळे करतानाचे फोटो त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. हा प्रकार सुमारे एक वर्षापूर्वी घडला होता. त्यानंतरही निशांत हा पीडित मुलीला कॅफेमध्ये घेऊन जात होता व तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचे फोटो मोबाईलमध्ये काढत होता. याची कुणकुण पीडित मुलीच्या आई- वडिलांना जानेवारी 2023 मध्ये लागली होती. त्यांनी पीडित मुलीला निशांत सोबत बोलायचे नाही, अशी समज दिली होती.
दरम्यान, 3 जुलै रोजी पहाटे तीन वाजता पीडित मुलीच्या निदर्शनास आले की, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॉलोवर्सना 3 जुलै रोजी पहाटे एक वाजता निशांत शेलार याने कॅफेमध्ये काढलेले अश्लिल फोटो पाठविले आहेत. पीडिताने सदरचा प्रकार तिच्या आई- वडिलांना सांगितला व त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.