मुलीचा छळ करणार्‍या विद्यालयातील कर्मचार्‍यास सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल
मुलीचा छळ करणार्‍या विद्यालयातील कर्मचार्‍यास सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील नामांकित विद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा तेथील कर्मचार्‍याने लैगिंक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी धरले. आत्माराम बापुराव लगड (वय 58 रा. आठवड ता. नगर) असे दोषी धरलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याला बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 10 प्रमाणे पाच वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच कलम 12 प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच नुकसान भरपाईपोटी पीडितेस एक हजार 500 रूपये दंडाच्या रकमेतून देण्याचा आदेश केलेला आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.ए.बरालीया यांनी हा निकाल दिला. सदर खटल्याचे कामकाज अति.सरकारी वकील अ‍ॅड.सी.डी.कुलकर्णी यांनी पाहिले. सदर घटनेतील अल्पवयीन मुलगी ही अहमदनगर येथील एका नामांकित विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती व ती नियमीतपणे शाळेत जात होती. ती 2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास व 4 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शाळेत गेली असता, तेथील कर्मचारी लगड याने तिचा लैगिंक छळ केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लगडविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर खटल्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डि.एस.मुंडे यांनी करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्यामध्ये अति. सरकारी वकील कुलकर्णी यांनी एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये पीडिता, पीडिताची आई व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाच्यावतीने नोंदविलेला भक्कम पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी आत्माराम बापुराव लगड यास शिक्षा ठोठावली. सदरच्या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस हवालदार के.एन.पारखे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com