
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याबद्दल संतोष तुकाराम गायकवाड (वय 27 रा. उक्कलगाव ता. श्रीरामपूर) याला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे - शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अल्पवयीन मुलगी 20 सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास टी.व्ही पाहण्यासाठी आरोपीच्या आत्याच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी संतोष तुकाराम गायकवाड हा एकटाच घरामध्ये होता. त्याने घरात इतर कोणी नाही, हे पाहून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीची चुलत बहिण तेथे आली. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला. पीडित मुलीने तिच्या आईला ही घटना सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपीविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, तिची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच आरोपीतर्फे आरोपीच्या चुलत बहिणीची साक्ष नोंदविण्यात आली. अल्पवयीन मुलगी ही केवळ 11 वर्षे वयाची आहे.
पीडित मुलगी आरोपीविरूध्द खोटे का सांगेल याबाबत कोणतेही कारण आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर आणले नाही, असा युक्तीवाद केला. सरकारी वकिलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून आडसूळ तसेच संजय पठारे यांनी सहकार्य केले.